लॉजमध्ये युवतीचा खून केल्याप्रकरणी संशयिताला अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील बसस्थानकासमोरील टुरिस्ट लॉजमध्ये वृषाली सूर्यवंशी या युवतीच्या खूनप्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली. अविनाश लक्ष्मण हत्तीकर (वय 25, रा. पंचशीलनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली होती. दरम्यान, दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. त्यातून अविनाशचे लग्न झाल्यानंतरही वृषाली त्याच्याकडे सातत्याने पैशांची मागणी करत होती. तिच्या पैशांच्या तगाद्याला वैतागून तिचा रूमालाने गळा आवळून खून केल्याची कबुली त्याने दिली आहे.

वृषाली सूर्यवंशी कुटूंबासह शहरातील पंचशीलनगर येथे रहात होती. त्याच परिसरात राहणार्‍या अविनाश हत्तीकर याच्याशी तीचे प्रेम संबंध होते. सहा महिन्यांपूर्वी अविनाशचे लग्न झाले होते. त्यानंतरही या दोघांचे प्रेमसंबंध सुरूच होते. दरम्यान, सूर्यवंशी कुटुंबिय भारतनगर येथे राहण्यास गेले. तरीही त्यांचे संबंध सुरूच होते. ते दोघेही वारंवार भेटत होते. त्याप्रमाणे बुधवारी रात्रीही ते भेटले. त्यानंतर त्यांनी शहरातील टुरिस्ट लॉजमध्ये एक रूम बुक केली. त्यावेळी त्यांच्यात पैशांवरून वादावादी झाली. या वादातून वृषालीने त्याच्या कानाखाली वाजवली होती. सीसीटीव्ही फुटेजमधून ते उघडकीस आले.

त्यानंतर तिच्या सातत्याने पैशांच्या मागणीला वैतागलेल्या अविनाशने तिचा रूमालाने गळा आवळून खून केला. त्यानंतर रात्रीच तो रूमला बाहेरून कडी लावून लॉजमधून पसार झाला. दरम्यान लॉजमध्ये दिलेल्या कागदपत्रांवरून त्याचे नाव निष्पन्न झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी पथकाला तातडीने तपास करून संशयिताला अटक करण्याचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील हवालदार बिरोबा नरळे यांना अविनाश हत्तीकर कोल्हापूर येथे असल्याची माहिती खबर्‍याद्वारे मिळाली. त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री पथकाने त्याला कोल्हापूर येथून अटक केली.

निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, बिरोबा नरळे, सागर लवटे, निलेश कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Visit : Policenama.com