पुण्यात मांडूळ तस्करी करणारा पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरात मांडूळ तस्करी करत ते विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला अलंकार पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून मांडूळ जप्त करण्यात आले आहे.

दिनेश धोंडीबा निमसे (वय. २६, रा. मु. पो. शिरापूर ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुजबळ बंगल्याजवळील बागेशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत काही जण जमले असून ते मांडूळ विक्रीसाठी आले आहेत अशी माहिती पोलीस कर्मचारी राजेंद्र लांडगे यांना बातमीदारामार्फत मिळाली. त्य़ानंतर तपास पथकाने पेरुच्या बागेजवळ संशय़ितांचा शोध घेत असताना मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या संशयिताबद्दल बातमीदाराने दूरून इशारा करून सांगितले. तात्काळ पोलिसांनी पाठीवर सॅक असलेल्या एका तरुणाला हटकले. तेव्हा तो पळून जाऊ लागला. त्याचवेळी पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेल्या निळ्या सॅकची तपासणी केली. तेव्हा त्यात पारदर्शक बरणीमध्ये  मांडूळ जातीचा साप आढळून आला. त्यानंतर वनरक्षक अभव भवारी यांनी निरीक्षण केल्यावर तो मांडळू जातीचा साप असल्याचे सांगितले. मांडूळ साप जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्पना जाधव, पोलीस निरीक्षक राजेश तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस पोलीस निरीक्षक संदिप बुवा, कर्मचारी बाबूलाल तांदळे, राजेंद्र लांडगे, योगेश बडगे, प्रफुल्ल चव्हाण, संदिप घनवटे, किरण राऊत यांच्या पथकाने केली.