2 कुटुंबातील कुत्र्यांमध्ये भांडण ! रागाच्या भरात तरुणाचा खून

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – कुत्र्यांमध्ये झालेल्या भांडणांमुळं वाद झाला आणि यातून शेजारी राहणाऱ्या युवकाचा विटा आणि दगडानं माराहण करून खून करण्यात आला. सदर युवक जखमी झाल्यानंतर त्याला सावंगी मेघे येथील हॉस्पिटलध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथंच त्याचा मृत्यू झाला. 16 डिसेंबर रोजी रात्री माळम्हसोला येथे ही घटना घडली. ग्रामीण पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

नेमकं प्रकरण काय ?
हागवणे आणि चव्हाण ही दोन कुटुंब माळम्हसोला गावात शेजारी राहतात. दोघांनीही कुत्रा पाळला आहे. दरम्यान 16 डिसेंबरच्या रात्री या दोन्ही कुटुंबाच्या कुत्र्यांमध्ये भांडण झालं. यावेळी रोहित रामचंद्र हागवणे (18) यानं शेजारी असलेल्या रमेश बबलूसिंग चव्हाण याला त्याचा कुत्रा घरात नेण्यास सांगितलं. यातून रमेशनं रोहितला शिवीगाळ केली. दोघांमधील शाब्दिक वाद एवढा वाढला की, रागाच्या भरात रमेशनं जवळच असलेल्या विटेने जमीनीवर पाडून रोहितला जीवघेणी मारहाण केली.

हा प्रकार पाहिल्यानंतर आरडाओरडा झाला आणि गावकरी जमा झाले. त्यांनी दोघांना वेगळं केलं. रोहित यात गंभीर जखमी झाला होता. त्याला यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं त्याची प्रकृती आणखी खालावली. डॉक्टरांनी त्याला नागपूरला नेण्याचा सल्ला दिला. सावंगी मेघे येथे उपचारादरम्यान बुधवारी रोहितचा मृत्यू झाला. हा प्रकार समोर आल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. आता हा गुन्हा खुनाच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आला आहे. या घटनेनं गावात खळबळ उडाली आहे.