बीड : व्यापाऱ्याची 43 लाख रुपयांची बॅग चोरणारे गजाआड

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिन वेगवेगळ्या गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. बार्शी बसस्थानकावर मुंबईच्या व्यापाऱ्याची 43 लाख रुपयांची बॅग चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. तर जुन्या भांडणातून तरूणाचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला गजाआड करण्यात आले आहे.

बीड जिल्ह्याती गुन्ह्यांचा तपास करत असताना, बार्शी बस स्थानकावरून मुंबईच्या व्यापाऱ्याची 43 लाखांची बॅग चोरून नेणारे चोरटे बीड शहरात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. अनंत सिताराम डिकुळे (वय-28) आणि शरद सिताराम डिकुळे (वय – 29 दोघे रा. घोटी. ता. करमाळा) यांना अटक करून पुढील कारवाईसाठी बार्शी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

नागझरी येथे किरकोळ कारणावरून संजयदत्त काकासाहेब चव्हाण (वय-19 रा.नागझरी) या तरूणाचा खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी नागझरी शिवारात आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नागझी शिवारात सापळा रचून एका आरोपीला अटक केली तर पाच आरोपींना बीड येथून अटक करण्यात आली. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी चार पथके रवाना करण्यात आली आहेत. अंबेजागाई पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला आंबेजोगाई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, गेवराई उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भारत राऊत, सहायक पोलीस निरीक्षक आघाव, गोसावी, पोलीस उपनिरीक्षक संतोष जोंधळे यांच्या पथकाने केली.