तोतया फौजदाराची रवानगी पोलीस कोठडीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – फौजदार असल्याचे भासवून नोकरीला लावण्याचे आमिष दाखविणाऱ्या आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या तोतयाला न्यायालयाने २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश दिला आहे.

संजय उल्हास शिंदे ( वय ३४ रा. काळे पडळ, हडपसर) असे अटक आरोपीचे नाव असून त्याला हडपसर पोलिसांनी काल अटक केली होती. त्याच्याविरुद्ध विशाल मधुकर भामे यांनी फिर्याद दिली. गुन्ह्याचा प्रकार गेल्या वर्षी नोव्हेंबर ते आज पर्यंत या कालावधीत घडला. आरोपीने फिर्यादींना तो फौजदार असल्याची माहिती दिली. फौजदाराचा गणवेश परीधान करून त्याने त्यांचा विश्वास संपादन केला होता.

नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आरोपीने फिर्यादी कडून ८० हजार रुपये घेतले होते. आरोपीने नोकरी लावली नाही त्याचप्रमाणे तो तोतया फौजदार असल्याची शंका आल्याने फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार केली होती. हडपसर पोलिसांनी आरोपीला अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले. सहाय्यक सरकारी वकील किरण बेंडभर यांनी आरोपीने अशाप्रकारे आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता व्यक्त केली.त्याच्याविरुद्ध अशा प्रकारचे काही गुन्हे नोंदवले गेले आहेत का याबाबत तपास करायचा आहे.

आरोपीच्या ताब्यातून एक मोटार, मोबाईल असा दोन लाख दहा हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असून आरोपीने आणखी काही लोकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. आरोपीने पोलिसाचा गणवेश कोठे तयार करून घेतला ? तो करण्यामागे त्याचा हेतू काय होता ? अशा विविध मुद्द्यांवर तपास करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी बेडभर यांनी न्यायालयाकडे केली होती प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस .देशपांडे यांनी आरोपीला २४ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला