‘त्या’ क्लिप्स व्हायरल करण्याची धमकी देत दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांना ५० कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या ५ जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर आणि शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतल्ले यांना राजकिय जीवन उध्वस्त करण्याची धमकी देत ५० कोटींची खंडणी मागणाऱ्या ५ जणांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीने बेड्या ठोकल्या आहेत.

सचिन ज्ञानेश्वर पडळकर (वय ३० वर्षे, रा. माळशिरस, जि. सोलापूर), डॉ. इंद्रकुमार देवराव  भिसे   (वय २१, रा. शिरूर),  दत्तात्रय पांडूरंग करे (वय रा. माळशिरस),  विकास शिवाजी आलदार (वय ३४, रा. माढा),  तात्यासाहेब लक्ष्मण कारंडे (वय २६, रा. माळेगाव ता.माढा) अशी पाच जणांची नावे आहेत.  याप्रकरणी अण्णासाहेब रुपनवर यांनी फिर्याद दिली आहे.

राजकीय जीवन संपविण्याची धमकी

या पाच जणांनी पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर व शेळी मेंढी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतल्ले यांना फोन करून तुमच्या विषयीच्या काही क्लीप्स आमच्याकडे आहेत. त्या माध्यमांपर्यंत आम्ही पोहोचवू आणि सोशल मिडीयावर व्हायरल करून तुमची बदनामी करू, तसेच तुमचे राजकीय जीवनच संपवून टाकू अशी धमकी देत ५० कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर तडजोडीअंती ते ३० कोटी रुपयांवर तयार झाले.

पहिला हप्ता स्विकारण्यासाठी आल्यावर जाळ्यात

यासंदर्भात या पाच जणांनी बारामती येथील हॉटेल कृष्ण सागर मध्ये प्राथमिक बैठक केली. त्यानंतर तडजोडीअंती ३० कोटींवर ते तयार झाले. दरम्यान याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली होती. त्यानुसार पोलिसांनी या पाच जणांवर पाळत ठेवली. दरम्यान या खंडणीतील पहिला हप्ता म्हणून १५ कोटी रुपये स्विकारण्याचे ठरले. आज हे पाचही जण बारामतीतील हॉटेल कृष्ण सागरमध्ये पैसे स्विकारण्यासाठी आले. तेव्हा पुणे ग्रामीण पोलिसांच्या एलसीबीचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट आणि त्यांच्या पथकाने सापळा लावला होता. हे पाच जण येताच त्यांना पैसे घेताना पकडण्यात आले. १५ कोटीच्या रकमेमध्ये काही खऱ्या नोटा आणि कागदांचे बंडल ठेवण्यात आले होते.

या पाचही जणांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट आणि त्यांच्या पथकाने केली.