पुण्यात महिला पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ, आरोपीला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोरेगाव पार्क भागात मध्यरात्री भर रस्त्यावर बेशिस्त वर्तन करत महिला पोलीस उप निरीक्षकाला शिवीगाळ केल्याची घटना सोमवारी (दि.२६) मध्यरात्री घडली. पोलिसांना शिवीगाळ करुन सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपीला कोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे.

प्रभज्योतसिंग दिलबाग सिंग (वय ४६, रा. डेक्कन गोल्ड अपार्टमेंट, युआन आयटीपार्क जवळ, खराडी) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी महिला पोलिस उपनिरीक्षक विद्या राऊत यांनी कोरेगाव पार्क पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क परिसरात मध्यरात्री अडीचच्या सुमारास सिंग बेशिस्त वर्तन करत होता. त्यावेळी हा प्रकार सोसायटीतील रहिवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सिंग याला जाब विचारला. त्यावर त्याने या रहिवाशांबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांनी पोलिसांना कळविले. त्यावेळी रात्रपाळीत गस्त घालणारे महिला पोलिस उपनिरीक्षक विद्या राऊत या तेथे आल्या.

त्यानंतर तक्रारादार रहिवासी जितेंद्र बडेकर, त्यांचा मित्र प्रफुल्लकुमार चव्हाण यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने पोलिसांना शिवीगाळ करुन धमकी दिली. त्याला पोलीस आणि रहिवासी समजावून सांगत होते. तरीही तो त्यांना जुमानत नव्हता. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सिंग याला अटक करण्यात आली. पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस करीत आहेत.