तडीपार गुन्हेगारचा शहरात ‘वावर’, पोलिसांनी मुसक्या आवळून जप्त केली 2 पिस्तुल अन् 3 काडतुसं

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला गुंडच पिस्तूल विक्री करण्यासाठी पुन्हा शहरात आल्यानंतर त्याला वानवडी पोलीसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 2 पिस्तूल आणि 3 काडतूसे जप्त करण्यात आली आहेत.

संतोष विनायक नातू (वय 43, रा. जांभळे पॅलेस जवळ महर्षी नगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात तडीपार गुंड, पाहिजे आरोपी आणि सराईत गुन्हेगारांची माहिती काढली जात आहे. तर, वाढत्या गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीसांना गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, वानवडी पोलीस हद्दीत गस्त घालत असतान सहाय्यक फौजदार प्रदीप गुरव यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गुंड नातू हा लुल्ला नगर चौक ते गोळीबार मैदान चौकाच्या दरम्यान असलेल्या लिटिल इटली या हॉटेलच्या समोरच्या बाजूस उभा असून त्याच्या हातामध्ये एक पिशवी आहे त्यामध्ये पिस्टल असून तो विक्री करण्याकरता घेऊन आला आहे. त्यानुसार, परिमंडळ पाचचे उपायुक्त सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील तपासपथकातील सहाय्यक फौजदार प्रदीप गुरव पो.हवा. दत्तात्रय तेलंग, पोलीस नाईक ज्ञानेश्वर गिरमकर, पो.ना सुदर्शन बोरावके यांच्या पथकाने त्याला सापळा रचून अटक केली.

त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ 2 गावठी कट्टे आणि तीन जीवंत काडतूसे मिळून आली. नातू याच्यावर शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून, त्याला स्वारगेट पोलीस ठाण्याकडून दोन वर्षासाठी शहरातून तडीपार करण्यात आले होते. मात्र, तो तडीपारी काळातही पुन्हा शहरात आल्याचे यावरून दिसत आहे. त्यामुळे पोलीसांच्या तडीपारीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/