‘या’ घातक हत्यारांचा वापर करुन ‘ती’ टोळी महामार्गावर करायची लुटमार

अहमदनगर : पोलीसनामा आॅनलाइन – राहाता पोलिसांनी नाकाबंदी करून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडवून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला जेरबंद केले. त्यांच्याकडून दरोडा व लूटमारीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे व मोटारसायकल जप्त केली आहे. आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने महामार्ग अथवा इतर ठिकाणी मोठी लूटमारची अथवा दरोड्याची घटना टळल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मंगळवारी रात्री २ वाजेच्या सुमारास राहाता पोलीस नगर- मनमाड महामार्गावर रात्रीची गस्त घालत होते. त्यांना महामार्गावर तीन मोटारसायकलवरून ६ ते ७ संशयीत इसम संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. राहाता पोलिसांनी पोलीस स्टेशनजवळच नाकाबंदी केली. लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी मोटारसायकलवरून ६ ते ७ इसम निर्मळ पिंपरी शिवारातून भरधाव वेगात शिर्डीकडे येत असल्याचे राहाता पोलिसांना कळवले होते.

राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण परदेशी यांनी पोलीस स्टेशनजवळील भडांगे यांच्या चहाच्या दुकानासमोर बॅरिगेटच्या सहाय्याने नाकाबंदी केली. रात्री २ वाजून ३० मिनिटाच्या सुमारास शिर्डीकडे भरधाव मोटारसायकलस्वारांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता त्यातील एका मोटारसायकलस्वाराने मोटारसायकल वळविण्याचा प्रयत्न केला.

या प्रयत्नात मोटारसायकल वेगाने दुभाजकावर जोरात आदळून रोडवरून घसरली. यामुळे आरोपी खाली पडले. त्यांच्यासोबत असलेले इतर दोन मोटारसायकलस्वार भरधाव वेगात निघून गेले. पडलेल्या तिघांपैकी एकास जास्त मार लागलेला असल्याने पोलिसांनी त्या तिघांना ताब्यात घेतले. त्याचवेळी लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील व सहकारी घटनास्थळी आले. त्यांनी व पोलीस निरीक्षक अरुण परदेशी यांनी शिर्डीच्या दिशेने मोटारसायकलवर भरधाव वेगाने गेलेल्या संशयितांचा पाठलाग करण्यास सांगितले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना साकुरी शिवाजवळ पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी त्यांना बोलते करताच त्यांनी कबुली दिली.

गणेश बाळासाहेब शेंडगे (२०, रा चिंचोली फाटा, ता. राहुरी, जि. अहमदनगर), अनिल काशिनाथ माळी (१८, रा. महालखेडा, ता. येवला, जि. नाशिक), आकाश रावसाहेब दुनबळे (१८, रा. महालखेडा, ता. येवला, जि. नाशिक), सोमनाथ रामदास खलाटे (रा. खलाटेवाडी, ता. आष्टी, जि. बीड), बाळासाहेब शिवाजी पगारे (२३, रा. शिंगवे, ता. राहाता), विश्वास बाळू साळवे (२०, रा. शिंगवे नाईक, ता. जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींनी नावे आहेत. तर एक आरोपी पळून गेला आहे.