दिल्ली हिंसाचार प्रकरणात परदेशी नागरिकासह दोघांना अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आरोपीना दिल्ली विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांनीही लाल किल्ला हिंसेवेळी पोलिसांवर हल्ला केला होता.

मनजिंदर जीत सिंग आणि खेमप्रीत सिंग असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मनजिंदर जीत सिंग हा डच नागरिक असून तो ब्रिटनमध्ये राहातो. तो खोट्या कागदपत्रांच्या आधारे विदेशात पळ काढण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. खेमप्रीत सिंग हा काही दिवसापासून फरार होता. अखेर त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीत प्रजासत्ताक दिनी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. त्यावेळी या आंदोलनाला हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणी आंदोलनकर्ते आणि पोलीस यांच्यात हिंसा झाली. तगडा पोलीस बंदोबस्त असतानाही आंदोलनकर्ते लाल किल्ल्यामध्येही घुसले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले आहे.