वर्दीतील कलाकारांना मिळणार हक्काचं व्यासपीठ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबई पोलीस दलातील कलाकारांच्या कलेला वाव देत हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली म्युझिकल प्रोजेक्ट फॉर मुंबई पोलीस हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत गायन तसेच वादनाची आवड असलेल्यांची यादी मागवली असून ही यादी मिळताच सर्वांचा एक ग्रुप तयार केला जाणार आहे. या ग्रुपमध्ये व्हिडिओ मागवून त्यातून निवड करण्यात येईल. निवड झालेल्या कलाकारांना यूट्यूब प्लॅटफॉर्म तसेच, रिॲलिटी शोमध्ये संधी देण्याकरीता रेकॉर्ड केलेले व्हिडिओ शेअर केले जाणार आहेत. पोलिसांना प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना राबवित असल्याचेही यात नमूद केले आहे.

मुंबई पोलीस दलात विशेषतः कोरोनाच्या काळात खाकीतील कलाकार मोठ्या प्रमाणात समोर आले. अशात, स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी ही मंडळी स्वतः संगीत, वादन तसेच वेगवेगळे छंद जोपासत आहेत. यातील अनेक जण आपले व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करीत आहेत. मुंबई पोलीस दलातील सर्व इच्छुक असलेले पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपली माहिती परिमंडळ कार्यालय, शाखा तसेच विभाग कार्यालयात पाठवावी. तेथून ही माहिती एकत्रित करत पुढे मंगळवारी सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबई पोलीस आयुक्तांच्या ईमेल आयडीवर पाठविण्याच्या सूचना पोलीस उपायुक्त (अभियान) चैतन्या एस. यांनी दिल्या आहेत.