महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण, पोलीस वाहनावर दगडफेक

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात पोलिसांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. नागपूर शहरात दोन दिवसात तीन ठिकाणी पोलिसांवर हल्ला करण्याच्या घटना घडल्या आहे. या घटनांमध्ये एका महिला पोलीस उपनिरीक्षकाला जमावाने केस पकडून मारहाण केली. तर दुसऱ्या घटनेत टोळक्याने पोलिसांना लाथाबुक्यांनी मारहाण करत पोलीस वाहनावर दगडफेक केली. या घटनांमध्ये पोलिसांनी बारा आरोपींना अटक केली आहे.

पहिली घटना हुडकेश्वरच्या नरसाळा येथील दर्शन कॉलनीत घडली. धीरज रमेश बांगारे याचे आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद असल्याने पत्नी दोन वर्षापासून नरसाळा येथे राहते. मंगळवारी रात्री धीरज पत्नीला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी पत्नीच्या कुटुंबाशी त्याचे वाद झाले. वादाचे रुपांतर मारहाणीत झाले. त्याने पत्नी आणि सासूला बेदम मारहाण केली. सासरची मंडळी आपल्याला मारतील या भितीने धीरजने त्याच्या भावाला आणि वहिनीला बोलावून घेत पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला.

हे ही वाचा – पुण्यात पद्मावती परिसरात तरुणाचा खुन 

नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार हुडकेश्वरचे पोलीस शिपाई प्रमोद हे घटनास्थळी पोहोचले. धीरज गोंधळ घालत असल्याचे पाहून त्यांनी त्याला तेथून निघून जाण्यास सांगितले. धीरजच्या घरच्यांनी प्रमोद यांना घेराव घालत बेदम मारहाण केली. याची माहिती त्यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर प्रमोद यांच्या मदतीसाठी आलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक घटनास्थळी आले. त्यांनी कुटुंबाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना देखील मारहाण करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली. महिला उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध पोलिसांशी मारहाण करणे, धमकी देणे आणि धीरजच्या पत्नीच्या तक्रारीवरून मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

दुसऱ्या घटनेत कोतवालीचे ठाणेदार उमेश बेसरकर यांना घेण्यासाठी पोलीस शिपाई विकास यादव हे पोलिसांची जीप घेऊन जात होते. त्यावेळी फरस गेटजवळ वीरेंद्र काळबांडे आपल्या साथीदारांसह गोंधळ घालत होता. रस्त्यावर गोंधळ सुरू असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. हे पाहून पोलिसांनी विकास यादव आणि वीरेंद्र काळबांडे यांना रस्त्यातून बाजूला होण्यास सांगितले. त्यामुळे संतापलेल्या आरोपींनी पोलीस वाहनावर दगडफेक केली. या घटनेत वीरेंद्र काळबांडे यास अटक केली. त्यानंतर वीरेंद्रचे साथीदार हिमांशु ऊर्फ पिन्नी जगदिश कनोजिया (१९) रा. छोटा धोबीपुरा, सदर जॉन्सन ऊर्फ रॉनी मायकल अंथोनी (२१), चेतन जगदीश रामटेके (२३) रा. बेलिशॉप क्वॉर्टर मोतीबाग, हिमांशु चंद्रशेखर मंतापूरवार (२४) गीतानगर, मानकापूर यांना अटक करण्यात आली.

तिसरी घटना आज (बुधवारी) दुपारी एकच्या सुमारास गणेशपेठच्या बसस्थानकाजवळ घडली. रिक्षा चालकांनी जामरची कारवाई करणाऱ्या दोन वाहतूक पोलिसांना मारहाण करून जखमी केले. किशोर धपके आणि प्रकाश सोनोने अशी जखमी वाहतूक पोलिसांची नावे आहेत. पोलिसांनी आरोपी सोनू कांबळे आणि मयुर राजुरकर यांच्या रिक्षाला जामर लावले. यामुळे दोन्ही रिक्षा चालकांनी वाहतूक पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरु केली. घटनेची माहिती मिळताच झोन ३ चे उपायुक्त राहुल माकणीकर, वाहतूक पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपींना अटक केली. जखमी पोलिसांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.