लातूर : पोलिसाने केली शेतकर्‍याला शेतात जाऊन बेदम मारहाण (व्हिडीओ)

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन – एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पोलिसाने त्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने लाठी आणि लाथा बुक्याने शेतकर्‍याला मारहाण केली आहे. लातूर जिल्ह्यातील चवनहिप्परगा (ता. देवणी) येथे ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी आता संबधित पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

गंगाधर कोतवाड असे मारहाण झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तर रमेश कांबळे असे बेदम मारहाण केल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी गंगाधर कोतवाड यांचा शेजारील शेतकऱ्यासोबत शेतीच्या कारणावरुन वाद झाला होता. त्यानुसार एकाची बाजू ऐकून घेत पोलीस कर्मचारी रमेश कांबळे यांनी आपल्याला मारहाण केली, असा आरोप कोतवाड यांनी केली आहे. रमेश कांबळे यांनी कोतवाड यांना बेदम मारहाण केली. लाकडी काठीने मारहाण करत असल्याचे व्हिडीओतून दिसून येत आहे. या प्रकरणी पोलिसांत अद्याप कोणतीही तक्रार दाखल झाली नाही.