15000 रुपयांची लाच स्विकारताना पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – सट्याची पेढी सुरु करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून 15 हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या पोलीस हवालदाराला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवार (दि.17) करण्यात आली. छोटू दामू बोरसे (वय-49) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. याप्रकरणी नगाव येथील 34 वर्षीय इसमाने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोमवारी (दि.16) तक्रार दिली.

पोलीस हवालदार छोटू बोरसे हा पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तक्रारदार यांना नगाव व चीचगाव येथे सट्ट्याची पेढी सुरु करायची असून यामध्ये मदत करण्यासाठी पोलीस हवालदार बोरसे याने तक्रारदाराकडे दहमहा 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीमध्ये 20 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता बोरसे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पथकाने आज सापळा रचून ठरलेल्या 20 हजार रुपयांपैकी 15 हजार रुपयांची लाच स्विकारताना छोटू बोरसे याला रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आरोपी छोटू बोरसे याच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधीक्षक निलेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल जयंत साळवे, पोलीस नाईक संतोष हिरे, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडीले, कैलास जोहरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी, भूषण खलानेकर, संदीप कदम यांच्या पथकाने केली.

लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.