केडगाव टोल नाक्यावर थरार ; फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन चोरट्याला पकडले

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – दौंड तालुक्यातील केडगाव केडगाव टोल नाक्याजवळ शिरूर-सातारा मुख्य रस्त्यावर यवत पोलिसांकडून नाकाबंदी सुरू असताना नाकाबंदी तोडून पळून जाणाऱ्या मोटारसायकल चोरास यवतचे पो.कॉ. तात्यासाहेब करे ब.नं. 2940 व पो.कॉ. गजानन खत्री ब.नं. 2209 यांनी दुचाकीवरून नऊ किलोमीटरचा थरारक पाठलाग करून जेरबंद केले आहे. हि घटना आज शनिवार दि 30/03/2019 रोजी मध्यरात्री 1:30 वा. चे. सुमारास घडली. कृष्णा उत्तरेश्वर टाचतोडे (वय 25, रा. नांनगाव, ता. दौंड, मूळ रा. पारा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) असे चोराचे नाव आहे.

police-daund

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यवतचे पो.कॉ. तात्यासाहेब करे आणि पो.कॉ. गजानन खत्री हे शनिवारी मध्यरात्री शिरूर-सातारा हायवेवरील केडगाव ता.दौंड येथील टोलनाक्याजवळ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांचे सुचने प्रमाणे नाकाबंदी करत होते. नाकाबंदी करीत असताना तेथे एक नंबर प्लेट नसलेली मोटर सायकल येत असल्याचे त्यांना दिसले यावेळी सदर पोलिसांनी मोटारसायकल स्वारास अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने नाकाबंदी ठिकाणावरून भरधाव वेगात येऊन नाकाबंदी ठिकाणी न थांबता पारगाव बाजूकडे निघून गेला. यावेळी करे आणि खत्री यांनी सदर मोटरसायकल स्वारास सुमारे नऊ किलोमीटर पाठलाग करून पारगाव येथील चौकामध्ये पकडले. आरोपी हा भरधाव वेगाने मोटार सायकल चालवून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करत होता. परंतु दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता आरोपीस शिताफीने पकडले. आरोपीने त्याचे नाव कृष्णा उत्तरेश्वर टाचतोडे वय 25 वर्ष, रा. नांनगाव, ता. दौंड, मूळ रा. पारा, ता. वाशी, जि. उस्मानाबाद असे सांगितले त्याच्याकडे मोटरसायकल बाबत अधिक चौकशी केली असता सदर मोटरसायकल बाबत यवत पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सदर आरोपीस दोन्ही पोलिसांनी जेरबंद करून त्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कॉ. त्यासाहेब करे आणि गजानन खत्री यांनी मागेही शिरूर येथून मोटार सायकल चोरास अटक करून त्याच्याकडून चोरलेल्या सात मोटार सायकली पुणे आणि अ.नगर जिल्ह्यातून हस्तगत केल्या होत्या.

यवत पोलिसांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून पो.कॉ. तात्यासाहेब करे आणि गजानन खत्री यांचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी विशेष अभिनंदन केले.