जुगारी पोलीस कर्मचारी पोलिसांच्या जाळ्यात

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरु असणाऱ्या जुगार आड्यावर पोलीस उपविभागीय कार्य़ालयाने छापा टाकाला. यावेळी जुगार आड्ड्यावर पोलिसच जुगार खेळत असताना आढळून आला. त्या पोलिसासह सात जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई गुरुवार परज येथे करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ७८ हजार २३० रुपयाची रोकड जप्त केली आहे. अटक करण्यात आलेला पोलीस सध्या मुख्यालयात कार्यरत असून या घटनेने सातार पोलीस दलात खळबळ उडाली आहे. . दरम्यान, या कारवाईत पोलिस अटक झाल्याबाबत कारवाई पथक, शहर पोलिस व मुख्यालयातून कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती.

राजेंद्र श्रीरंग फडतरे (वय 54, रा. दौलतनगर) असे या पोलिसाचे नाव असून त्याच्या सह शरद शामराव साळुंखे (वय 51, रा. शाहूनगर), सतीश वसंत भांडे (वय 65, रा. मंगळवार पेठ), सतीश बाळकृष्ण साळुंखे (रा. अर्कशाळा परिसर), दत्ता मुगुटराव जाधव (रा. शनिवार पेठ), दिलावर मोहसीन शेख, सलाउद्दीन दिलावर शेख (दोघे रा. गुरुवार परज) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, यातील अटक केलेला राजेंद्र फडतरे हा पोलीस हवालदार आहे.

सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांना मंगळवारी दुपारी गुरुवार परजावर जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळाल्यानंतर खातरजमा करून त्यांनी पोलिसांचे एक पथक तयार केले. पोलिस पथकाद्वारे दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास छापा टाकला असता तेथे हे संशयित कल्याण नावाचा जुगार खेळत होते. पोलिसांची रेड पडल्याचे समोर येताच संशयितांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्याठिकाणी एकूण 1 लाख 78 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. त्यामध्ये रोकड, तीन मोबाईल, जुगाराचे साहित्य आहे.  यातील संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर अधिक चौकशी केली असता राजेंद्र फडतरे हा संशयित  पोलिस असल्याचे समोर येताच कारवाईच्या पथकातील पोलिस अवाक् झाले.

सर्व संशयितांना ताब्यात घेवून शहर पोलिस ठाण्यात आणले. बुधवारी पहाटे गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व संशयितांना अटक  करण्यात आली व लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. संपूर्ण रात्र लॉकअपमध्ये काढल्यानंतर दुपारी पोलिसासह सर्व संशयितांना पोलिस व्हॅनमधून सातारा जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. याठिकाणी सर्व संशयितांना जामीन मंजूर झाला.

या कारवाईत महिला फौजदार वर्षा डाळींबकर, पोलिस हवालदार बालम मुल्‍ला, एस.डी.भुरे, व्ही.एन.देशमुख, एस.ए.पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला.