पोलिसांच्या मुलांनी देखील संधींचा फायदा घ्यावा अन् यशस्वी उद्योजक व्हावे : पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिसांच्या मुलांना उद्योजक बनविण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पुढाकार घेतला आहे. या मुलांना योग्य दिशा देण्यासाठी उद्योजकता पिंपरी-चिंचवड पोलीस, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी परिचय कार्यशाळेचे आयोजन केले होते . त्यावेळी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलिसांच्या मुलांनी स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे. त्यासाठी संधींचा फायदा घेऊन यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी समाजासमोर यावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमास अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त मंचक इप्पर उपस्थित होते.
कृष्ण प्रकाश म्हणाले, कर्तव्य बजावत असताना पोलिसांना आपल्या कुटुंबकडे लक्ष देण्यास वेळ नसतो. त्यामुळे त्यांचे स्वतःच्या मुलांकडे दुर्लक्ष होते. मुलांचे शिक्षण आणि रोजगार किंवा स्वयंरोजगार याबाबत उपाययोजना करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही. त्यासाठी १८ ते ४५ वयोगटातील पोलिसांच्या पाल्यांना स्वतःच्या पायावर उभे करून रोजगार देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.

पोलिसांच्या पाल्यांना उद्योजकता उपक्रमांतर्गत स्वतःचा व्यवसाय, उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच बँकेच्या माध्यमातून ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध होऊन त्यावर १५ ते ३५ टक्के अनुदानदेखील मिळणार आहे. या संधींचा फायदा घेऊन पोलिसांची मुले स्वतः उद्योजक होऊन इतरांना रोजगार देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.