ऑनलाईन मद्य विक्रीच्या नावाखाली सायबर ‘भामटे’ करताहेत शौकिनांना ‘लक्ष्य’, मुंबई पोलिसांकडून बनावट नंबरांची यादी जाहीर
मुंबई : शासनाने ऑनलाईन मद्य विक्रीला परवानगी दिली आहे़ त्याचा गैरफायदा सायबर चोरट्यांनी घेतला असून परराज्यातील या चोरट्यांनी मद्य शौकिनांना टारगेट करुन त्यांची फसवणुक सुरु केली आहे. मुंबई पोलिसांनी अशा फसवणुक करणार्या ७३ बनावट क्रमांकाची यादी जाहीर केली आहे. त्याचवेळी असोशिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह रिटेल लिकर विक्रेते संघटनेने मुंबईत फक्त कॅश ऑन डिलिव्हरीद्वारे मद्य विक्री केली जात असल्याचे स्पष्ट केले आहे.
लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय बंद असल्याने सरकारचा महसुल घटला आहे. महसुल मिळविण्यासाठी सरकारने मद्य विक्रीची दुकाने उघडण्याबरोबरच ऑनलाईन मद्य विक्रीला परवानगी दिली आहे. त्याचा सायबर चोरट्यांनी गैरफायदा घेत मुंबईतील लिकर दुकानांच्या नावाने आपले बनावट मोबाईल नंबर इंटरनेटवर टाकले. प्रत्यक्षात हे बनावट नंबर हरियाना, राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल येथील आहेत. इंटरनेटवर तुम्ही तुमच्या घराजवळच्या लिकरचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न केला तर हे बनावट नंबर तुम्हाला दिसतात. तुम्ही त्यांच्यावर संपर्क साधल्यावर ते अगोदर पेमेंट करावे लागेल, असे सांगून तुम्हाला एक लिंक पाठवितात. ती भरल्यानंतर तुम्हाला पेमेंट भरण्याच्या नावाखाली तुमची सर्व माहिती घेऊन तुमच्या खात्यातून ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करुन घेऊन तुमची फसवणुक करतात. मुंबईत अशा प्रकारे मद्यशौकिनांना फसविल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यातूनच मुंबई सायबर पोलीस ठाण्याने ७३ बनावट मोबाईल नंबरची यादी जाहीर केली असून या नंबरवर फोन करुन मद्याची ऑर्डर देऊ नका. त्यांच्याशी संपर्क करु नका असे पोलिसांनी केले आहे.
त्याचवेळी असोशिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह रिटेल लिकर विक्रेत्यांनी मुंबईतील किरकोळ दारु विक्रेते हे गुगल पे, पेटीएम इत्यादी माध्यमातून कोणत्याही प्रकारचे ऑनलाईन पेमंट स्वीकारत नाहीत. मुंबईत अनेक ऑनलाईन पेमेंट घोटाळे झाले आहेत आणि या घोटाळ्यांमुळे कित्येक ग्राहकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वाईन शॉप साठा वितरण होण्यापूर्वी पेमेंट मागणार नाही. कोणालाही मद्य वितरणापूर्वी पैसे देऊ नका. वाईन शॉप्स कॅश ऑन डिलिव्हरी स्वीकारत आहेत. आणि मद्यच्या डिलिव्हरीनंतर पैसे देण्यासाठीच्या सुविधेसाठी क्रेडिट कार्ड मशीनदेखील पुरवित आहेत. असे आवाहन असोसिएशनने केले आहे.