पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची ‘पोलीसनामा’ आणि ‘DeccanExpress’च्या कार्यालयास सदिच्छा भेट, पत्रकारांशी विविध विषयांवर वार्तालाप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज (शुक्रवार) पोलीसनामा आणि ‘DeccanExpress’च्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली. आयुक्त गुप्ता यांनी पोलीसनामा ऑनलाइनच्या टीमसोबत विविध विषयांवर वार्तालाप केला. आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर समोर असलेल्या आव्हानांचा बिमोड करत सर्वकाही पुर्वपदावर आणल्याबाबतची माहिती त्यांनी दिली.

पुणे शहर पोलिस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर शहरातील गुन्हेगारी कमी करण्याचं मोठं आव्हान समोर होतं. त्याचा बिमोड करून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत आयुक्तांनी माहिती दिली. टोळीने मिळुन केलेल्या गुन्हयांत मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं. आयुक्तालयातील अनेक विभागांची पुर्नरचना करण्यात आली. त्यानंतर काम करणं अधिक सोपं झालं आणि ते सर्वांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून स्विकारल्याचं स्पष्ट झालं असून गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यास तसेच गुन्हेगारी कमी करण्यास त्याचा मोठा फायदा होत असल्याचं त्यांनी सांगितलं. गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखेची पुर्नरचना करण्यात आली आहे. त्याबाबत नियमावली देखील तयार करण्यात आली आहे.

अलिकडील काळामध्ये सायबर गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. सायबर भामटयांना रोखण्यासाठी तसेच सायबर भामटयांचा मज्जाव करण्यासाठी शहर पोलिस दलाकडून युध्दपातळीवर प्रयत्न चालू आहेत. आगामी काही दिवसात सायबर गुन्हे शाखेची देखील पुर्नरचना करण्यात येणार आहे. त्याबाबत नियमावली तयार करण्याचे काम चालु असल्याचं पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी यावेळी सांगितले. कोरोना काळात सध्यातरी शहरात वाहतूकीची समस्या नाही. आगामी काळात देखील वाहतूकीची समस्या निर्माण होणार नाही या दृष्टीकोनातून शहर वाहतूक शाखा प्रयत्नशील राहणार असल्याचे ते म्हणाले.


ग्रामीण पोलिस दलातील 2 पोलिस ठाण्यांचा नुकताच पुणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत समावेश करण्यात आला आहे. शासन स्तरावर याबाबत अध्यादेश देखील काढण्यात आला आहे. ते दोन्ही पोलिस स्टेशन देखील लवकरच पुणे शहर पोलिस आयुक्तालयात समाविष्ट होतील असा विश्वास आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला आहे. पुणेकरांचे हित लक्षात घेवुनच पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी काम करावे याबाबतचे आदेश आपण आयुक्त पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर काढल्याचे त्यांनी सांगितले.

सायबर गुन्हे शाखेची पुर्नरचना करत असताना बँक फ्रॉड, एटीएम क्लोनिंग, नेट बँकिंगव्दारे फसवणूक आणि इतर तत्सम हेडखाली स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात येणार असून त्याचा तपास करणारे अधिकारी देखील स्वतंत्र असणार आहेत.

 

लवकरच सायबर गुन्हे शाखेची पुर्नरचना करण्यात येणार असल्याचं आयुक्तांनी पोलीसनामा ऑनलाइन टीमसोबत बोलताना शेवटी स्पष्ट केले.