पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा दणका ! अवैध धंद्यांचा ‘बादशहा’ म्हणून प्रसिद्ध असणारा सोमनाथ गायकवाड याच्यासह सूरज ठोंबरे टोळीतील 8 जणांवर मोक्का

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मध्यवस्तीत वर्चस्वावरून दोन गटात वाद झाल्यानंतर गुंड बंडू आंदेकर टोळीवर मोक्कानुसार कारवाई करताच पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सूरज ठोंबरेच्या टोळीवर देखील मोक्काची कारवाई केली आहे. 8 जणांवर मोक्का लावला आहे. या कारवाईत पोलीस आयुक्तांनी समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे करणाऱ्या बड्याहस्तीचा देखील समावेश आहे.

कानिफनाथ विनोद महापुरे (वय 23), ओंकार गजानन कुडले (वय 21), राजन मंगेश काळभोर (वय 22), शुभम दीपक पवळ, आकाश मंगेश सासवडे, नरसिंग भिमा माने, सूरज अशोक ठोंबरे व सोमनाथ सयाजी गायकवाड अशी मोक्कानुसार कारवाई केलेल्याची नावे आहेत. यात कानिफनाथ विनोद महापुरे (वय 23), ओंकार गजानन कुडले (वय 21), राजन मंगेश काळभोर (वय 22) यांना अटक केली आहे. तर इतर जण फरार आहेत.

गुंड सूरज ठोंबरे हा टोळी प्रमुख आहे. तो आणि सोमनाथ गायकवाड हे पूर्वी आंदेकर टोळीचे सदस्य होते. पण 2018 मध्ये ते या टोळीतून बाहेर पडले. त्यानंतर आंदेकर व ठोंबरे याच्या टोळीत धुसपुस सुरू होती. यावरून वाद देखील झाला होता. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात बंडू आंदेकरसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर समर्थ पोलीस ठाण्यात ठोंबरे व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गेल्या दोन दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्त गुप्ता यांनी आंदेकर टोळीवर मोक्काची कारवाई केली. यात मटका किंग नंदकुमार नाईक याचा देखील समावेश आहे. दरम्यान, आता समर्थ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात सूरज ठोंबरे आणि त्याच्या इतर साथीदारांवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठ निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी या टोळीवर मोक्का लावावा असा प्रस्ताव परिमंडळ एकच्या उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्याकडे पाठवला होता. त्यांनी त्याची छाननी करून तो अप्पर पोलीस आयुक्त डॉ. शिंदे यांच्याकडे पाठवला. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कारवाईचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, या कारवाई देखील अवैध धंद्यांचा बादशहा म्हणून प्रसिद्ध असणारा सोमनाथ गायकवाड याचा समावेश आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या या कारवाईने मात्र शहरात खळबळ उडाली आहे. अवैध धंदे करणाऱ्याना मोक्का ही पहिलीच वेळ असल्याने त्याची अधिक चर्चा होऊ लागली आहे. तर इतरांच्या मनात धडकी भरली आहे.