चोरीच्या वाळूसह 4 ट्रक पकडले, सुमारे 46 लाखाचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) – पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे (एलसीबी) शाखेचे पथकाने यवत पोलीस स्टेशन हद्दीत सोलापूर रोड कासुर्डी टोलनाका येथे अवैध चोरीची वाळू वाहतुक करणारे ४ ट्रकवर कारवाई करून ४६,१२,०००/- रुपयाचा माल जप्त केला आहे.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी याबाबत माहिती देताना पुणे जिल्हयामध्ये अवैध वाळू चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेले गुन्हे शाखेचे पथकातील महेश गायकवाड, निलेश कदम, दत्ता तांबे, गुरू गायकवाड, सुभाष राऊत यांचे पथकाने दिनांक ९ ऑगस्ट २०१९ रोजी रात्री ०१.०० वा. चे सुमारास पुणे-सोलापूर रोड, कासुर्डी टोलनाका ता.दौंड जि.पुणे येथे बॅरीकेटचा अडथळा व नाकाबंदी करून कारवाई करीत १) टाटा हायवा ट्रक नंबर एमएच-४२ एआर ५ यावरील चालक दत्ता तात्या गिरमकर वय २९ वर्षे रा.देऊळगाव राजे ता. दौड जि. पुणे २) टाटा हायवा ट्रक नंबर एमएच-४२ टी ४१३१ यावरील चालक गोविंद सुरेश निंबाळकर वय ३३ वर्षे रा. शिरापूर ता. दौड जि. पुणे ३) टाटा हायवा ट्रक नंबर एमएच-४२ टी ७७११ यावरील चालक धुळा लाला टुले वय २२ वर्षे रा.रुईगव्हाण ता.कर्जत जि.अहमदनगर ४) टाटा ट्रक नंबर एमएच १२ केक्यु ९४५६ यावरील चालक (फरार) हे त्यांचे ताब्यातील ४ ट्रकमध्ये अनधिकृत, बेकायदा, विनापरवाना एकूण १४ ब्रास वाळू किं.रू.१,१२,०००/- ची वाहतुक करीत असताना मिळून आलेने वाळूसह चार ट्रक एकूण किंमत ४६,१२,०००/- असा माल जप्त करण्यात आला.

त्या चारही ट्रक चालकांविरुद्ध यवत पोलीस स्टेशनला भा.दं.वि. कलम ३७९, ३४ व पर्यावरण संरक्षण कायदा कलम ९, १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून जप्त मुद्देमाल व आरोपी यांना पुढील कारवाईसाठी यवत पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींनी सदरची वाळू कोठून चोरली? याबाबतचा अधिक तपास यवत पोलीस स्टेशन करीत असून सदर ट्रकवर महसूल व आरटीओ विभागाकडूनही मोठ्या स्वरूपात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सदर कारवाईमुळे वाळू माफियांचे दाबे दणाणले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने चार दिवसांपूर्वीच लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत पुणे-सोलापूर रोड कवडीपाट टोलनाका येथे अवैध चोरीची वाळू वाहतुक करणारे ४ ट्रकवर कारवाई करून ४६,१२,०००/- रुपयाचा माल जप्त केलेला होता. जिल्हयात यापुढेही अशीच कारवाई चालू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त