पुण्यात अंमली पदार्थाचा ‘धंदा’ तेजीत ; मांजरी परिसरात मोठ्या प्रमाणात गांजा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील उंड्री परिसरात ९१ लाखांचे कोकेन जप्त केल्याची घटना ताजी असतानाच त्याच रात्री ४ लाखांच्या गांजासह दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. काही दिवसापूर्वी सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी देखील पुण्यामध्ये लाखो रुपयांचे अंमली पदार्थ पकडले होते. त्यामुळे पुण्यात अंमली पदार्थाचा धंदा तेजीत असल्याचे दिसून येत आहे.

उंड्री परिसरात केलेल्या कारवाईदरम्यान पोलिसांनी ९१ लाखांचे कोकेन जप्त केले होते. त्याप्रकरणी एका नायजेरीयन व्यक्तीला अटक केली होती. हि कारवाई होत नाही तोच त्याच रात्री मोठ्या प्रमाणात गांजा पकडण्यात आला आहे. मांजरी बुद्रुक येथील घुले वस्ती परिसरात गुन्हे शाखेच्या युनिटने ३ लाख ८६ हजार २५० रुपयांचा २५ किलो गांजा मध्यरात्री एकच्या सुमारास पकडला. यामध्ये पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. सुमित भाऊसाहेब बर्वे (वय- २३ रा. ताम्हाणे वस्ती ता. दौड), पंकज अभिमन्यु रणवरे (वय-३० रा. आंबेडकरनगर, बाणेर) असे पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समिर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस उपनिरीक्षक आनंद रावडे, निखील पवार, पोलीस कर्मचारी प्रदिप शिंदे, एकनाथ कंधारे, संतोष मते, अविनाश मराठे, शिवानंद बोले, महेश कदम, विजय गुरव, फिरोज बागवान यांच्या पथकाने केली.

 

Loading...
You might also like