25 हजाराची लाच घेताना पोलिस कर्मचार्‍यासह ‘पंटर’ अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये संशयिताला दिल्ली येथून ताब्यात घेण्यासाठी दिल्ली प्रवास खर्चासाठी २५ हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस कॉन्स्टेबलसह त्याच्या चहा विक्रेत्या पंटरला अँन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी रात्री उशीरा लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरील मध्यवर्ती चौकात करण्यात आली.

अजिज रमजान शेख (वय-५२ रा. कसबा बावडा) असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. तर दाऊद बाबालाल पाटणकर (वय-४५ रा. रविवार पेठ) असे चहा विक्रेत्या पंटरचे नाव आहे. सोमवारी रात्री उशीरा लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी एका निवृत्त बँक कर्मचाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदार यांनी प्लॉट खरेदीसह घर बांधणीसाठी दिल्ली येथील सौभाग्य फायनान्स कंपनीकडून दीड वर्षापूर्वी संपर्क साधला होता. फायनान्स कंपनीने तक्रारदार यांच्याकडून कागदपत्र घेऊन त्यांना ८ कोटी रुपये कर्ज मंजूर केले असल्याच सांगितले. मात्र, त्यासाठी विविध शुल्क स्वरूपात ऑनलाईनद्वारे टप्प्याटप्प्याने काही रक्‍कम भरावी लागेल, असेही सांगण्यात आले.त्यानुसार तक्रारदार यांनी २२ लाख ३७ हजार रुपये भरले होते. पैसे देऊनही कर्जाची रक्कम देण्यास कंपनीने टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारदार यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला.

लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील पथक दिल्ली येथे जाणार होते. पोलीस कॉन्स्टेबल अजिज शेख याने तक्रारदाराशी संपर्क साधून प्रवास खर्चासाठी २५ हजार रुपयांची मागणी केली. पैशासाठी तगादा लावल्यामुळे तक्रारदार यांनी पैसे देण्यास तयार झाले. दरम्यान, तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष पडताळणी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच अजिज शेख याने पैसे पोलीस ठाण्यात घेऊन येणास सांगितले.

सोमवारी रात्री तक्रारदार हे २५ हजार रुपये देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले. त्यावेळी अजिज शेख याने स्वत: पैसे न स्विकारता पोलीस ठाण्याच्या पाठिमागे असलेल्या चहाच्या टपरीवर दाऊत पाटणकर याच्याकडे पैसे देण्यास सांगितले. पाटणकर याच्याकडे रक्कम दिली. पाटणकर याला पैसे मोजत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. यानंतर पोलीस कॉन्स्टेबल अजिज शेख यालादेखील ताब्यात घेण्यात आले.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आरोग्य विषयक वृत्त

रक्ताची गाठही ठरू शकते मृत्यूचे कारण ; वेळीच व्हा सावध

पावसाळ्यात त्वचेची घ्या अशी ‘काळजी’

सांधे आणि स्नायूंचे दुखणे दूर करण्यासाठी करा ‘हे’ उपाय

सतत तणाग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते

You might also like