10000 रुपयाची लाच घेताना पोलिस हवालदार ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अदखलपात्र तक्रारीमध्ये दोन्ही कुटुंबात तडजोड करुन दिल्याच्या मोबदल्यात 10 हजार रुपयाची लाच (Bribe) घेताना अकोले पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाला (policeman) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (दि.14) अकोले पोलीस ठाण्यात करण्यात आली. संतोष पुंजा वाघ असे लाच घेणाऱ्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी तक्रारदार यांनी अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. तक्रारदार यांची भाचीचे तिचे कौटुंबिक वादाच्या कारणावरुन तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात अदखलपात्र तक्रार दाखल केली होती. या दोन्ही कुटुंबामध्ये तडजोड करुन दिल्याच्या मोबदल्यात पोलीस हवालदार संतोष वाघ याने तक्ररादार यांच्याकडे 10 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पंचासमक्ष पडताळी केली असता संतोष वाघ याने तक्रारदार यांच्याकडे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज अकोले पोलीस ठाण्यात सापळा रचण्यात आला. संतोष वाघ याला तक्रारदार यांच्याकडून लाचेची 10 हजार रुपयांची रक्कम घेताना रंगहेथ पकडण्यात आले. आरोपी संतोष वाघ याच्यावर अकोले पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.