Pulwama Attack : कॉन्स्टेबलचा अनोखा आदर्श, शहिदांच्या मदतीसाठी ‘तो’ करतोय असे काही

रामपूर : वृत्तसंस्था – पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० पेक्षा जास्त जवान शहीद झाले. अवंतीपुरा येथे हा हल्ला झाला. यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. शहीदांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. शिवाय अनेकजण जमेल त्या रुपाने शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदत करत आहेत. अशातच एक पोलीस काॅन्स्टेबल ३ दिवसांची सुट्टी घेऊन शहीदांच्या कुटुंबीयांसाठी निधी गोळा करत आहे. फिरोज खान असं या काॅन्स्टेबलचं नाव असून तो उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. याशिवाय फिरोज खान लोकांना मदत करण्याचं आवाहन करत आहेत.

याबाबत बोलताना फिरोज म्हणाले की, “मी निधी गोळा करण्यासाठी ३ दिवसांची सुट्टी मागितली आणि ती मंजूर झाली. मला जे शक्य आहे ते मी करत आहे. मला लोकांचा चांगला पाठिंबा मिळत आहे.” दरम्यान सोबत एक बोर्ड घेऊन दुचाकीवरून फिरोज खान पूर्ण शहरभर फिरत आहे. त्याने बोर्डवर एक संदेश लिहिला आहे. शहिदांच्या कुटुंबीयांसाठी निधी जमा करण्यास मदत करा असा संदेश त्यांने बोर्डवर लिहिले आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल रशीद गाझीचा खात्मा केल्यानंतर भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्यांना कठोर इशारा दिला आहे. दहशतवाद्यांनी एकतर हत्यारं सोडून समर्पण करावं किंवा मग मरणास सामोरं जाण्यास तयार राहावे, असा स्पष्ट इशाराच भारतीय लष्कराने पत्रकार परिषदेत दिला आहे. ”दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदवर पाकिस्तानी सैन्य आणि ISI चा वरदहस्त आहे. जैश-ए-मोहम्मद पाकिस्तानी सैन्याचंच अपत्य आहे”, असा थेट निशाणाच भारतीय लष्कराने पाकिस्तानवर साधला आहे.