पोलीसातील ‘देवदूता’ने केले 50 बेवारस कोरोनाग्रस्त मृतदेहावर अंत्यसंस्कार, लोकांकडून कौतुकाचा वर्षाव

मुंबईः पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या या संकटात नाती पोरकी झाली आहेत. कुटुंबीय, नातेवाईक कुणीही मदतीला येत नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूनंतर सख्खे नातलग अंतिम दर्शनालाही येत नाहीत. अशावेळी पोलीस दलातल्या एका देवदूताने केलेल्या कामाला कडक सलाम ठोकला पाहिजे. पोलीस नाईक ज्ञानदेव वारे यांनी कोरोनाने मृत्यू झालेल्या तब्बल 50 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले असून आजही त्यांचे काम सुरु आहे. त्यामुळे देव कोणी पाहिला असे जर आजच्या काळात कुणाला विचारले तर खाकीतल्या या देवापेक्षा तो तरी वेगळा काय असणार असेच म्हणावे लागेल. या समाजसेवेमुळे वारे यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

पोलीस नाईक ज्ञानदेव वारे हे गेल्या 20 वर्षांपासून बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत. त्यांनी आतापर्यंत 50 हजारांहून अधिक मृतदेहांना मुक्तीचा मार्ग दाखवला आहे. कोरोना संकटातही त्यांनी आपला समाजसेवेचा वसा सुरु ठेवलेला आहे. वारे हे कोणत्याही धर्मातील व्यक्तीचा मृतदेह असेल तर त्याचा अंत्यविधी त्या धर्मातील पध्दतीनुसार विधीवत करतात.

कोरोनाने मृत्यू झालेल्या जवळपास 50 पेक्षा अधिक मृतदेहांवर वारे यांनी आतापर्यंत अंत्यसंस्कार केले आहेत. कोरोनाने मृत्यू झालेल्या मृतदेहाजवळ जाणे म्हणजे साक्षात मृत्यूला मिठी मारल्यासारखे आहे. पण तरीही जराही भिती न बाळगता सर्व काळजी घेऊन ज्ञानदेव वारे हे काम करतात. हॉस्पिटलच्या शवागारात जाऊन करोनाने मृत्यू झालेले मृतदेह पोलिस शववाहिणीत ठेवून ते मृतदेह अंतिम संस्कारासाठी घेऊन जातात. विशेष म्हणजे कुटुंबीयांकडूनही वारे यांना यासाठी प्रोत्साहन मिळत आहे.