पोलिस कॉन्स्टेबलच्या पतीचा सपासप वार करुन निर्घृण खून, प्रचंड खळबळ

नालासोपारा/मनोर : पोलीसनामा ऑनलाइन – वसई पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या पतीचा सपासप वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ढेकाळे गावात बुधवारी (दि.17) रात्री घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला आहे.

पुंडलिक आनंदा पाटील (वय-30 रा. पोलीस कॉलनी, रुम नं. 7) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पाटील यांच्या पत्नी स्नेहल पाटील या वसई पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. मयत पुंडलिक पाटील हे रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री मनोर येथे जाण्यासाठी प्रवासी भाडे आल्याने ते प्रवाशाला घेऊन जात होते. रात्री सव्वा बाराच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ढेकाळे गावच्या हद्दीत त्यांची रिक्षा प्रदीप बाबर यांना दिसली.

प्रदीप बाबर यांनी जवळ जाऊन पाहिले असता रिक्षामध्ये पुंडलिक पाटील यांचा मृतदेह आढळून आला. पाटील यांच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस उजव्या कानावर धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसले. त्यांनी या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. पाटील यांचा खून कोणी आणि कोणत्या कारणावरुन केला हे अद्याप समजू शकले नसून पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली.