रजा नाकारल्यानंतर पोलिसाने वरिष्ठांवर 13 गोळया झाडल्या ; उपनिरीक्षकाचा मृत्यू तर वरिष्ठ निरीक्षक, कर्मचारी जखमी

हावडा : वृत्‍तसंस्था – आसाम राज्य सशस्त्र पोलिस दलातील वरिष्ठांनी जवानाला त्याच्या स्वतःच्या लग्‍नासाठी निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर रजा नाकारल्याने संतप्‍त झालेल्या जवानाने वरिष्ठांवर बेछूट गोळीबार केला. जवानाने एकुण 13 गोळया झाडल्या. त्यामध्ये एका पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला तर इतर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुरूवारी घडली घडली आहे. या प्रकारामुळे संपुर्ण आसाम राज्य सशस्त्र पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

लक्ष्मीकांत (26) असे गोळीबार करणार्‍या जवानाचे नाव आहे. त्याने केलेल्या गोळीबारात पोलिस उपनिरीक्षक भोलानाथ दास यांचा मृत्यू झाला आहे तर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल राजबंशी आणि पोलिस शिपाई रोंतूमणी बोधक हे गंभीर जखमी झाले आहेत. दि. 20 मे रोजी लक्ष्मीकांतचे लग्‍न होते. गेल्या काही दिवसांपासुन लक्ष्मीकांत हा नैराश्यात असल्यामुळे त्याच्यावर उपचार चालु होते. दरम्यान, त्याला त्याच्या लग्‍नासाठी रजा हवी होती. मात्र, ती वरिष्ठांनी नाकारली. त्यामुळे त्याचा आणि वरिष्ठांचा वाद झाला. त्यानंतर त्याने थेट वरिष्ठांवर बेछूट गोळीबार करत तब्बल 13 गोळया झाडल्या. त्यामध्ये पोलिस उपनिरीक्षक भोलानाथ दास यांचा मृत्यू झाला तर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल राजबंशी आणि पोलिस कर्मचारी रोंतूमणी बोधक हे गंभीर जखमी झाले. गोळया झाडून लक्ष्मीकांतने पलायन करण्याचा प्रयत्न केला. तेथे उपस्थित असलेल्या इतर सहकार्‍यांनी त्याला पकडले. याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश हावडा जिल्हा दंडाधिकारी चैताली चक्रवती यांनी दिले आहेत.

लक्ष्मीकांतला त्याच्या लग्‍नासाठी एक आठवडयाची सुट्टी हवी होती. मात्र, वरिष्ठांनी त्याच्या रजेचा अर्ज फेटाळला होता. बुधवारी संध्याकाळी रजा नाकारल्यापासुन तो रागात होता. गुरूवारी त्याला निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर रूट मार्चसाठी बोलावण्यात आले होते. रूट मार्चला जाणे लक्ष्मीकांतने टाळले होते. त्यानंतर लक्ष्मीकांतला शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार होते. वरिष्ठ अधिकारी अपमानजनक वागणुन देत असल्याची जाणीव लक्ष्मीकांतला झाली होती. त्यानंतर ही घटना घडली आहे. या घटनेमुळे संपुर्ण आसाम सशस्त्र पोलिस दलात खळबळ उडाली आहे.