Coronavirus Lockdown : पोलिस कर्मचार्‍यानं अडवली ‘कलेक्टर’ची गाडी, जाणून घ्या काय झाला परिणाम

बुलंदशहर/उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लाॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लॉकडाऊन दरम्यान अनावश्यकपणे फिरणाऱ्यावर बंदी आहे. परंतु बरेच लोक अद्याप लॉकडाऊन दरम्यान फिरताना दिसत आहेत. अशा लोकांना पोलीस लॉकडाऊनचे महत्त्व पटवून देत आहेत आणि त्यांना घरातच राहण्याचे आवाहन करत आहेत. पण नुकतेच उत्तर प्रदेशात असे काही घडले की त्यामुळे सर्वांनाच चकित केले.

उत्तर प्रेदशातील बुलंदशहरमध्ये चालकासह तीन जण कारमध्ये फिरत होते. त्यावेळी रस्त्यावर तैनात असलेल्या एका हवालदाराने त्यांची गाडी अडवली. या हवालदाराने गाडीत बसलेल्या लोकांना कोरोनाच्या संकटाची माहिती देऊन त्यांना कोरोना पासून बचाव करण्यासाठी घ्यवयाच्या काळजी विषयी माहिती दिली. यानंतर काहीवेळाने त्यांना सोडून देण्यात आले.

या गाडीत कोण बसलंय याची माहिती पोलीस हवालदाराला नव्हती. या गाडीमध्ये जिल्हा दंडाधिकारी बसले होते आणि ते लॉकडाऊन दरम्यान परिस्थितीचा पाहणी करण्यासाठी अचानक बाहेर पडले होते. जिल्हा दंडाधिकारी रवींद्र कुमार यांनी आपण कारमध्ये बसलो आहोत आणि तपासणी करण्यासाठी फिरत असल्याची माहिती शेवटपर्यंत त्या पोलीस हवालदाराला कळू दिली नाही. काही वेळाने लॉकडाऊन दरम्यान आपले कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडल्याबद्दल जिल्हा दंडाधिकारी यांनी हवालदार अरुण कुमार यांना एक पत्र दिले. या पत्रामध्ये त्यांनी योग्यरित्या पार पाडलेल्या कर्तव्याबाबत त्यांचे कौतुक केले होते. तसेच त्यांना 2000 हजार रुपयाचे बक्षीस देखील देण्यात आले होते. यानंतर हवालदार अरुण कुमार यांना समजले की, आपण जी कार आडवली होती, त्या कारमध्ये जिल्हा दंडाधिकारी बसले होते.

जिल्हा दंडाधिकारी यांच्यासह अनेक अधिकारी लॉकडाऊन दरम्यान पाहणी करण्यासाठी फिरत असतात आणि परिस्थितीचा आढावा घेत असतात. दरम्यान, अशाच प्रकारे जिल्हा दंडाधिकारी हे देखील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फिरत असताना हवालदार अरुण कुमार यांनी त्यांची कार सिकंदराबाद परिसरात अडवून त्यांना समज देऊन त्यांची कार सोडली.

या घटनेबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सिकंदराबादजवळ जिल्हा दंडाधिकारी यांची कार आडवण्यात आली. त्यावेळी हवालदार अरुण कुमार यांनी त्यांना लॉकडाऊन दरम्यान असे फिरणे कायद्याने गुन्हा असल्याचे सांगितले. तसेच लॉकडाऊनचे नियम देखील समजावून सांगितले. त्यांनी सांगितले की पोलीस हवालदार अशा प्रकारे आपले कर्तव्य बजावत असल्याचे पाहून आम्हाला आनंद झाला आहे. ही फक्त घटना आहे. सर्व अधिकारी लॉकडाऊन दरम्यान पाहणी करून नागरिकांना लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याचे आणि घरात राहण्याचे आवाहन करत आहेत.