‘या’ प्रकरणात सापडल्याने पोलीस हवालदाराचे निलंबन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन- ‘बिल्डर’ बरोबर संगनमत करून मूळमालकाच्या तीन फ्लॅटचा जबरदस्तीने ताबा घेणाऱ्या सांगवी पोलिस ठाण्यातील हवालदारावर निलंबनाची कारवाई पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी केली आहे.

सांगवी पोलीस ठाण्यात चालक म्हणून असणारे दीपक खाडे यांचे निलंबन केले आहे. तर सतीश देविदास वायचळ (४९, रा. जुना आळंदी रोड, मोशी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर मित कन्स्ट्रक्शनचे बिल्डर जितेंद्र राठोड, सांगवी पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे हवालदार दीपक खाडे, उज्वला दीपक खाडे, अनिषा अनिल खाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वायचळ आणि राठोड यांच्यामध्ये विकसन करार झाला होता. त्यानुसार वायचळ यांनी त्यांची पिंपळेगुरव येथील जागा राठोड यांना विकसित करण्यासाठी दिली होती.

या जागेवर राठोड यांनी बिल्डिंग उभी केली. त्यातील ७ फ्लॅट करारनाम्यानुसार वायचळ, त्यांचा भाऊ आणि बहिण यांच्या नावावर केले. तर राठोड यांच्या मालकीचे असणाऱ्या पैकी एक फ्लॅट खाडे यांना विक्री केला. त्यानंतर वायचळ यांच्या मालकीचे तीन फ्लॅट त्यांनी काही वर्ष भाडेतत्त्वावर दिले होते. ते त्यांना आता विक्री करायचे होते. त्यामुळे वायचळ यांनी ही बाब राठोड यांना सांगितली. तेव्हा बिल्डर राठोड यांनी हे तिन्ही फ्लॅट रंगरंगोटी आणि दुरूस्त करून विक्री करून देतो असे वायचळ यांना सांगितले. त्याच्या किल्या स्वतःकडे ठेवून घेतल्या.

राठोड यांनी वायचळ यांच्या परस्पर हे फ्लॅट खाडे यांना कमी किमतीत विक्री केले. ही बाब वायचळ यांना त्यांच्या भावाने कळविली. त्यामुळे त्यांनी आळंदी येथून पिंपळेगुरव येथे येऊन पाहणी केली. तेव्हा तेथे अन्य लोक राहत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी या लोकांकडे चौकशी केली तेव्हा त्या लोकांनी हे फ्लॅट खाडे यांच्याकडून भाडेतत्त्वावर घेतल्याचे सांगितले.

वायचळ यांनी खाडे यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्याच्यात वाद झाले. वायचळ यांनी तीन पैकी एका फ्लॅटला कुलूप लावले. खाडे यांनी ते कुलूप काढून टाकले. तसेच या तिन्ही फ्लॅटवर वायचळ यांच्या परवानगी व्यतिरिक्त परस्पर ताबा घेतला असे पोलिसांनी यावेळी सांगितले. या सर्व प्रकारानंतर वायचळ यांनी याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात अनेक तक्रारअर्ज दिले. पण त्यावर कार्यवाही झाली नव्हती. त्यामुळे वायचळ यांनी पोलिस आयुक्त पद्मनाभन यांची भेट घेऊन तक्रार केली. त्यानंतर याबाबत पोलिस हवालदार खाडे व बिल्डरसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  त्यानंतर पोलीस आयुक्तांनी खाडे यांच्यावर निलंबनची कारवाई केली आहे.