भाजपालाच मतदान करा असे सांगणारा निवडणूक अधिकारी पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कसबा विधानसभा मतदार संघातील श्री शिवाजी मराठा महाविद्यालयात असलेल्या मतदान केंद्रात थेट निवडणूक अधिकार्‍यानेच मतदारांना भाजपाला मतदान करा असे सांगितल्याने मतदान केंद्रावर खळबळ उडाली. दरम्यान, पुणे लोकसभा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार मतदार केंद्रावर दाखल झाल्यानंतर संबंधित निवडणूक अधिकार्‍याची काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी उलट-तपासणी घेतली त्यावेळी निवडणूक अधिकार्‍याचे त-त-म-म झाले. त्यानंतर काँग्रेसच्या उमेदवाराने कार्यकर्त्यांना संबंधित निवडणूक अधिकार्‍याच्याविरूध्द पोलिसांकडे तक्रार देण्यास सांगितले.

काँग्रेसचे पदाधिकारी बाळासाहेब अमराळे यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी निवडणूक अधिकारी राजेश भोसले याला ताब्यात घेतले आहे. भोसले याला मतदान केंद्रावरून ताब्यात घेवुन पोलिस स्टेशनकडे रवाना झाले. सायंकाळपर्यंत पोलिसांची कारवाई चालु होती. दरम्यान, अशा प्रकारची घटना इतर कोठे होत आहे काय याबाबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खातरजमा केली आणि तशी काळजी घेण्याबाबत कार्यकर्त्यांना सुचना दिल्या. मात्र, कसबा विधानसभा मतदान संघातील श्री शिवाजी मराठा महाविद्यालयातील या घटनेमुळे काही काळ काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. निवडणूक अधिकारी राजेश भोसले, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे उमेदवार यांच्यामध्ये झालेली बातचीत सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असताना पहावयास मिळते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like