ड्युटीवर असताना भरधाव ट्रकच्या धडकेत पोलिसाचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगातील वाहनाने दिलेल्या धडकेत कर्तव्य बजावणाऱ्या राज्य महामार्ग पोलीस दलातील हवलदार शहाजी भाऊराव हजारे यांचा मृत्यू झाला. आज दुपारी नगर-सोलापूर रस्त्यावरील मांडवगण फाटा परिसरात हा अपघात झाला. अपघातानंतर वाहनासह चालक पसार झाला. परंतु महामार्ग पोलिसांनी शिर्डीजवळ त्याला पकडले.

पोलीस हवालदार शहाजी हजारे हे केडगाव पोलीस मदत केंद्रात नेमणुकीस आहेत. आज सकाळी ते नगर-सोलापूर रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी गेले होते. मांडवगण फाट्याजवळ भरधाव वेगातील वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत हजारे हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. चालक वाहन वेगात घेऊन निघून गेला.

पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू होताच जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळापासून तब्बल नव्वद किलोमीटर अंतरावर शिर्डी जवळ ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे. पोलीस हवालदार हजारे हे नगर तालुक्यातील चिंचोली पाटील येथील रहिवासी आहेत. कर्तव्य बजावताना त्यांचा मृत्यू झाल्याने चिंचोली पाटील परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like