पोलीस दलातील श्वानाने चपलांच्या वासावर घेतला 2 आरोपींचा शोध; ‘सिबा’ची कामगिरी

शिक्रापुर : पुणे ग्रामीण पोलीस दलातील श्वान असलेल्या ‘सिबा’ने गुन्हेगारांच्या चपलांच्या वासावर पोलिसांना एका गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना पकडून देण्यात महत्वपूर्ण कामगिरी बजावली असल्याची माहिती रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली आहे.

शिरुर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगाव कर्डे रोड येथील गावडे वस्ती येथे 29 जानेवारी रोजी रात्री दोनच्या सुमारास पाच ते सहा चोरट्यानी दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने खोली समोरील पत्र्याच्या पडवीमध्ये झोपलेल्या पाच व्यक्तींना मारहाण करत त्यांच्याकडील दोन तोळे वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 75 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. चोरट्यांनी मारहाण केल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

याबाबत रांजणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील तपासासाठी वेगवेगळी चार तपास पथके तयार करुन आरोपीचे रेखाचित्र तयार करण्यात आले आणि रेकॉर्डवरील आरोपींच्या फोटोची मिळतेजुळते संशयित आरोपींचा शोध सुरू झाला. यामध्ये चार संशयितांना ताब्यात घेऊन घटनास्थळी आढळलेल्या चपलांच्या ठस्यांच्या आधारे श्वान ‘सिबा’ने चपलांचा वास घेऊन संशयित आरोपीमधून गुन्ह्यातील दोन आरोपींना ओळखले.

त्यानुसार आरोपी सुरज मनचक्या भोसले (वय 20), दीपक मनचक्या भोसले (वय 23) दोघे राहणार करपडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर यांना 1 फेब्रुवारी 2021 रोजी अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी भोर अमृत देशमुख,यांच्या आदेशाने पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट,रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व सहाय्यक पोलीस निरीक्षक एस जे येळे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इंस्पेक्टर शुभांगी कुटे, पोलीस हवालदार तुषार पंदारे, पोलीस नाईक गणेश सुतार, सहाय्यक फौजदार मुस्ताक शेख, विजय शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, पोलीस नाईक विलास आंबेकर, पोलीस कॉन्स्टेबल हाळनोर, ज्ञानेश्वर शिंदे, साबळे, विनोद काळे, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहाय्यक पोलीस फौजदार दत्तात्रय गिरमकर, गणेश नाईक राजू मोमीन ,पोलीस कॉन्स्टेबल मंगेश थिगळे, अजित भुजबळ, उमाकांत कुंजीर पोलिस हवालदार गणेश फापाळे, पोलीस कॉन्स्टेबल बी एस ए चौधरी पोलीस कॉन्स्टेबल एस डी रोकडे या पथकाने केली आहे.