हडपसर-तुकाईदर्शन येथील पांजरपोळमधील जनावरांना पोलिसांनी दिला चारा

पुणे : कोरोना व्हायरसचा फटका मुक्या प्राण्यांनाही बसला आहे. बेवारस 15-20 मुकी जनावरे आहेत. त्यांना चारा मिळेनासा झाला आहे, ही बाब लक्षात घेऊन हडपसर पोलीस स्टेशनमधील पोलीस हवालदार तानाजी देशमुख आणि नितीन चौधरी यांनी शेवाळेवाडी भाजी मंडई येथे रस्त्याच्या बाजूला पडलेला भाजीपाला व हिरवा चारा जमा केला आणि हडपसर तुकाई टेकडी येथील पांजरपोळमधील पशुधनाला देण्याचे काम कोविड-19 विघ्नहर्ता पोलीस मित्रांच्या मदतीने सुरू केले आहे.

देशमुख आणि चौधरी म्हणाले की, हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील कोविड-19 विघ्नहर्ता पोलीस मित्रांनी तुकाई टेकडी येथील पांजरपोळमधील जनावरांना दोन दिवसांपासून खाण्यासाठी चारा नाही. याची तातडीने दखल घेऊन मांजरी उपबाजार येथील रस्त्याच्या बाजूला भाजीपाला आणि चारा पडलेला जमा केला आणि पांजरपोळ येथील जनावरांना उपलब्ध करून दिला, असे त्यांनी सांगितले.

पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त कल्याण विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, पोलीस निरीक्षक हमराज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तानाजी देशमुख, नितीन चौधरी आणि पोलीस मित्रांनी हा उपक्रम राबविला.