कर्मचारी धबधब्यात गेला वाहून, ‘हे’ 4 पोलिस तिथं कशाला गेले होते

अहमदनगर, पोलीसनामा ऑनलाईन : पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरणाजवळ चार रेल्वे पोलीस धबधबा पाहण्यासाठी गेले असता त्यापैकी एक पोलीस कर्मचारी पाण्यात वाहून गेला. माहिती मिळताच प्रशासनाने शोध मोहीम सुरू केली होती परंतु रात्र असल्याने या कामात यश मिळालेले नाही.

याबाबत पारनेरचे तहसीलदार यांनी माहिती दिली असून ते म्हणाले की अहमदनगरमधील रेल्वे पोलीस दलाचे चार पोलिस कर्मचारी आज मांडओहळ धरणाजवळ असलेला रूईचोंडा धबधबा पाहण्यासाठी गेले होते. दरम्यान त्या धबधब्यात पोलीस कर्मचारी गणेश दहीफळे पडले आणि ते पाण्यात वाहून गेले. त्यांच्यासमवेत असणाऱ्या यू. एल. कोंगे, ए. एम. मुठे, जे. एस. शेख यांनी त्यांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु ते अपयशी ठरले.

या घटनेबाबत पारनेरच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेस त्वरित सूचित केले गेले. त्यानंतर पथकाने घटनास्थळी पोहोचून शोध मोहीम सुरू केली. तथापि, अंधारामुळे आणि जास्त पाण्याच्या प्रवाहामुळे अडचणी निर्माण झाल्या आणि रात्री शोध मोहीम बंद करण्यात आली होती. दरम्यान आज सकाळपासून पुन्हा शोध कार्य सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान सर्वांना हा प्रश्न पडला आहे की सध्या धरण क्षेत्र आणि निसर्गरम्य स्थळांवर पर्यटन करण्यास सक्त मनाई असताना हे पोलीस तिथे का गेले होते.