‘या’ गावाचे लाजिरवाणे नाव बदलण्यात पोलीस कर्मचाऱ्याला यश 

नंदुरबार : पोलीसनामा आॅनलाइन – गाव तसं चांगलं पण..असे म्हणण्याची पाळी एका गावातील गावकऱ्यांवर आली होती. कारण या गावाचे नावच त्यांना लाजिरवाणे वाटत होते. या गावाचे नाव होते छिनालकुवा. गावाचे नाव सांगतांना बऱ्याचदा अवघडलेपणा जाणवायचा. मात्र या गावाचे नावच बदलण्याचा निर्धार गावातील एका पोलीस कर्मचाऱ्याने केला आणि तो यशस्वी करूनही दाखवला. भरत पावरा असे त्यांचे नाव आहे.

शासन दरबारी पाठपुरावा केल्याने ९ वर्षानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून छिनालकुवा गावाची ओळख आता सुर्यपूर या नावाने होणार आहे, अशी अधिसूचनाही निघाल्याने अनेकजण भरत पावरा यांचे कौतूक करत आहेत. गावाचे नाव सांगतांना प्रत्येकाची छाती इंचभर फुलते. मात्र अक्राणी तालुक्यातील छिनालकुवा येथील रहिवाश्यांना बाहेर कोणत्याही ठिकाणी गेल्यावर गावाचे नाव सांगतांना मात्र अवघडलेपणा जाणवायचा. बऱ्याचदा अपमानित देखील व्हावे लागायचे. ग्रामस्थांना सतावणाऱ्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी पोलिस दलात कार्यरत असणारे पोलिस नाईक भरत पावरा यांनी गावाचे नाव बदलवूनच सन्मान प्राप्त करुन द्यायचा असा निर्धार केला. त्यानुसार त्यांनी शासन दरबारी तब्बल ९ वर्षापर्यंत पाठपुरावा केला.

सन १९९९ मध्ये ते पोलिस दलात कार्यरत झाल्यावर मुंबई येथे सेवा बजावत असतांना गावाचे नाव बदलण्यासाठीच्या हालचाली सुरु केल्या. त्यानुसार सन २००९ मध्ये जून महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन गावाचे नाव बदलण्यासाठीची विनंती केली. त्यानंतर त्यांनी पालकमंत्री, मुख्यमंत्री, ग्रामीण विकास मंत्री, गृहमंत्री, आदिवासी विकास मंत्री, राज्यपाल आणि शासन दरबारातील सारेच उंबरठे झिजविले. सततचा पाठपुरावा त्यांनी सुरुच ठेवला. सन २०१५ मध्ये राज्यपाल विद्यासागर राव पिंपळखुटा आले असता त्यांच्याकडेही पाठपुरावा केला आणि अखेर सततच्या पाठपुराव्यानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. १२ नोव्हेंबर २०१८ पासून अक्राणी तालुक्यातील छिनालकुवा वनगावाचे नाव सुर्यपूर असे करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी प्रसिद्ध केली आणि संपूर्ण ग्रामस्थांना आनंद झाला.

महिला स्वच्छतागृहात अश्लिल फोटो काढणाऱ्यांना अटक