१७ वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे करणारा पोलीस कर्मचारी गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन-पुण्यातील मुंढवा परिसरातील बिशप स्कूलमधील विद्यार्थीनी सोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेला पोलीस कर्मचारी मुंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत असून या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी १७ वर्षीय तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेनंतर मुंढवा पोलिसांनी पोलीस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. ही घटना २७ ऑक्टोबर रोजी रात्री एक ते अडीच दरम्यान पीडित मुलीच्या सोसायटीत घडली होती.

विकास मुसळे असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पीडित मुलगी १२ वी इयत्तेत शिकते. पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार, ती आपल्या मित्रांसोबत ताडीवाला रोडजवळ गप्पा मारत उभी होती. त्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी उलटसुलट प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. पीडित मुलीने आम्ही मित्र असून गप्पा मारत असल्याचे पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी दोघांना त्यांच्या आई वडिलांना या विषयी तक्रार करणार असल्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलगी आणि तिचा मित्र दोघेही घाबरले. दोघांना घरी सोडण्याच्या बहाण्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या गाडीवर बसवून मुलीला तिच्या घरी सोडण्यासाठी गेले. मुलगी राहत असलेल्या सोसायटीत गेल्यानंतर मुसळे याने त्याच्यासोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला खालीच उभारण्यास सांगून पीडित मुलीला सोडण्यासाठी घेऊन गेला. दरम्यान, सोसायटीच्या लिफ्टमध्ये गेल्यानंतर मुसळे याने पीडित मुलीसोबत अश्लील चाळे केले. या घटनेमुळे मुलगी घाबरल्याने तिची मानसीक स्थिती ढासळली.

या घटनेच्या दुसऱ्या दिवशी पीडित मुलीची परिक्षा होती. त्यामुळे ती परिक्षा देण्यासाठी शाळेत गेली होती. मात्र, परिक्षेदरम्यान तिची मानसिक स्थिती योग्य नसल्याचे शिक्षकांनी पाहिले. शिक्षकांनी पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडे चौकशी केली. मात्र, ती काहीच सांगत नसल्याने काऊंन्सलरची मदत घेण्यात आली.

त्यावेळी मुलीने पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस या घटनेचा तपास करत असताना पोलीस कर्मचारी मुसळे याच्या वागणूक संशायस्पद दिसून आली. मुलीला घरापर्य़ंत सोडण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याला अर्धा तास लागला. मात्र, मुलीच्या घरी जाण्यासाठी केवळ एक मिनीटाचा वेळ लागत असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले. या घटनेचा संपूर्ण तपास करुन पोलीस कर्मचारी विकास मुसळे विरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. पुढील तपास मुंढवा पोलीस करीत आहेत.