पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले ; युवकाचा प्रजासत्ताकदिनी आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर : पोलिसनामा आँनलाईन – खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलिसांची चौकशी करण्याच्या मागणीसाठी अविनाश शेटे या नेवासा तालुक्यातील युवकाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले. मात्र पोलिसांनी त्याला वेळीच पकडल्याने पुढील अनर्थ टळला.

याबाबत माहिती अशी की, शेटे यांनी काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले होते. त्यामध्ये पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे सदर पोलिसांची चौकशी करावी, अशी मागणीही केली होती. यासाठी वेळोवेळी उपोषण केली होती. मात्र चौकशी केली जात नव्हती. अखेर शेटे याने २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यानुसार तो आपल्या साथीदारासह दुचाकीवर जिल्हाधिरीकार्यालयासमोर आला. त्याने मोटरसायकलवरूनच अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेण्यास सुरुवात केली. मात्र, अगोदरच सतर्क असलेल्या पोलिसांनी त्याला लागलीच ताब्यात घेतले.

तौसिफ शेख प्रकरणातून घेतला धडा
महिन्यात २० डिसेंबरला कर्जत येथील तौसिफ शेख या युवकाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले होते. यावेळी गंभीर जखमी होऊन तौसिफ जागीच मयत झाला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हा पोलीस प्रशासन हादरून गेले होते. यामध्ये काही प्रमाणात प्रशासनाचा हलगर्जीपणाही समोर आला होता. त्यामुळे आज अविनाश शेटे याने आत्मदहनाचा इशारा दिल्यामुळे पोलीस प्रशासनाच्यावतीने सदर प्रकरणातून धडा घेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.