फोन घरी विसरला, भामट्याने घातला पोलिसाच्या पत्नीला १ लाख २० हजारांचा गंडा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बँकेतून बोलत असल्याचे सांगत क्रेडिट कार्डवरील खेरीदीसाठी ऑफर असल्याच्या बहाण्याने अज्ञाताने पोलिसाच्या पत्नीलाच १ लाख २० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसाच्या पत्नीने रबाळे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

शिवाताई लक्ष्मण जायभाये यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाताई जायभाये यांचे पती लक्ष्मण जायभाये हे मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांची नेमणूक सध्या ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात आहे. काही महिन्यांपुर्वी त्यांनी क्रेडिट कार्ड घेतले होते. शुक्रवारी ते आपला फोन कामावर जाण्याच्या घाईत घरी विसरले. तेव्हा अज्ञाताने त्यांच्या मोबाईलवर फोन केला. तेव्हा शिवाताई य़ांनी फोन घेतला. त्याने शिवाताई यांना वेगवेगळ्या ऑफर्स क्रेडिट कार्डवर असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याने त्यांच्याकडून मोबाईलवर आलेला ओटीपी विचारला. त्यांनी ओटीपी सांगितला. तेव्हा काही वेळातच जायभाये यांच्या क्रेडिट कार्डमधून ९० हजार आणि ३० हजार रुपये अशा दोन टप्प्यात रक्कम वजा केल्याचे मेसेज त्यांच्या मोबाईलवर आले. ही बाब लक्ष्मण जायभाये यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लागलीच कार्ड ब्लॉक केले. त्यानंतर त्यांनी रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास रबाळे पोलीस करत आहेत.