‘ओटीपी’द्वारे फसवणूक, पोलिसांमुळे मिळाले २५ हजार!

सातारा : पोलिसनामा ऑनलाईन

सध्या सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सातारा येथील विलास भानुदास काटकर यांना देखील सायबर क्राईम चा ‘याचे देही याची डोळा’ अनुभव आला आहे. एकाने बँकेचा मॅनेजर बोलतोय असे सांगून मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक मागवून खात्यातील 50 हजार रुपये चोरल्याची घटना घडली. पण सुदैवाची बाब अशी की,सातारा सायबर सेल पोलिसांनी तांत्रिक सहाय्याच्या मदतीने तत्काळ गतीमान तपास करुन तक्रारदाराचे 25 हजार रुपये मिळवून दिले. दरम्यान, तक्रारदार यांनी ओटीपी क्रमांक शेअर केल्याने त्यांची फसवणूक झाली असून ‘ओटीपी’ क्रमांक कोणालाही देवू नये, असे आवाहन सातारा पोलिसांकडून करण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विलास भानुदास काटकर (रा.काटकरवाडी, पुसेगाव ता.खटाव) यांना अज्ञाताने फोन करुन ‘बँकेतील मॅनेजर बोलत असल्याचे सांगितले.’ तसे सांगून मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक देण्यास सांगितल्यानंतर काटकर यांनी तो दिला. याचा गैरफायदा घेऊन अज्ञाताने तक्रारदार काटकर यांच्या बँकेच्या खात्यातील ४४ हजार ९९८ रुपये फसवणूक करुन चोरले.

बँकेच्या खात्यावरील पैसे गेल्याचा मेसेज तक्रारदार काटकर यांना आल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तत्काळ त्यांनी सातारा सायबर सेल पोलीस ठाण्याशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी तपास करुन तक्रारदार काटकर यांचे 24 हजार 999 रुपये मिळवून दिले. याप्रकरणाचा तपास स.पो.नि गजानन कदम, पो. हवा. विक्रांत फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव यांनी केला.