गणेश जगताप यांचा ‘शौर्य’ पुरस्काराने सन्मान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल गणेश जगताप यांना हुतात्मा अपंग बहुद्देशिय विकास संस्था ओगलेवाडी कराड यांच्यावतीने चतुर्थ हुतात्मा पुरस्काराने गौरवण्यात आले. गणेश जगताप यांना संस्थेकडून देण्यात येणारा शौर्य पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण रविवारी (दि.16) संस्थेच्या 18 व्या वर्धापन दिनानिमित्त शाहू स्मारक येथील आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. हा पुरस्कार कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला.

यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक डॉ. सुहास वरके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, हुतात्मा दुध संघाचे चेअरमन गौरव नायवाडी, सांगली महापालिका उपायुक्त राजेंद्र तेली, कॅन्सर तज्ज्ञ डॉ. मनोज लोखंडे, कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक जालिंदर महाडीक, कराड नगरपरिषदेचे नगरसेवक सौरव पाटील, समाजसेवक सुदेश दळवी, अमजद जैनुदिन मुजावर, अमोल कोरगावकर, विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.

गणेश जगताप यांना यापूर्वी पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक पदक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. यासह पुणे भुषण पुरस्कार, पुणेरत्न वर्दितील माणुसकी पुरस्कार, राजस्तरीय हुतात्मा गौरव पुरस्कार, सामाजिक सुरक्षा गौरव पुरस्कार, लोकमंगल गौरव पुरस्कार, समाज गौरव पुरस्कार, पोलिस मित्र संघटना राज्यस्तरीय पुरस्कार, आदर्श सेवा पुरस्कार, पुणे भुषण प्रेरणा, कला उपासक, अक्कलकोट भुषण पुरस्कार यासारखे असंख्य सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील पुरस्कार मिळाले आहेत.

गणेश जगताप यांनी आतापर्यंतच्या सेवेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना अनेक रिवार्ड मिळाले आहेत. तर बेपत्ता अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यास मदत केली. तर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत असताना त्यांनी बळजबरीने वेश्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या राज्यातील आणि विदेशातील मुलींची सुटका करण्यास मदत केली.