दिल्ली पोलिसांनी दिली मोर्चाला ‘परवानगी’, योगेंद्र यादव म्हणाले – शांततेत निघेल ‘ट्रॅक्टर परेड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाची राजधानी दिल्लीत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड (Tractor Parade) ला पोलिसांकडून परवानगी मिळाली आहे. रविवारी स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव (Yogendra Yadav) यांनी ही माहिती दिली आहे. हा मेळावा शांततेत पार पडेल असा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान प्रजासत्ताक दिनी पोलिसांनी जवानांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी शेतकऱ्यांना तीन मार्गांवर मोर्चा काढण्यास परवानगी दिली होती.

पत्रकारांशी संवाद साधताना योगेंद्र यादव म्हणाले, “आज दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांसोबत एक छोटीशी बैठक होती.” त्यांनी माहिती दिली की, “आम्हाला ट्रॅक्टर रॅलीसाठी पोलिसांकडून औपचारिक परवानगी मिळाली आहे.” यावेळी ते म्हणाले, “जसे की मी पूर्वी सांगितले होते, तसे प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेड शांततेत पार पडेल.” सकाळी शेतकऱ्यांनी पोलिसांना पत्र लिहून रॅलीसाठी परवानगी मागितली होती.

दिल्ली पोलिसांकडून शेतकऱ्यांना 26 जानेवारीला ट्रॅक्टर रॅलीसाठी परवानगी मिळाली आहे. दरम्यान, दिल्ली पोलीस आयुक्तांनी जवानांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. ते म्हणाले, “प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या सुरक्षेसाठी तैनात सीएपीएफ आणि अन्य सैन्याचे सर्व अधिकारी आणि जवान सज्ज असतील.” ते म्हणाले की, “किसान ट्रॅक्टर रॅलीच्या संदर्भात अधिकारी व सैनिकांनी तातडीने नोटीस मिळाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेसाठी सज्ज राहावे.”

या रस्त्यांवर निघेल ट्रॅक्टर रॅली
प्रस्तावाच्या सुरूवातीपासूनच शेतकरी राजधानीतील आउटर रिंग रोडवर मोर्चा काढण्याविषयी बोलत होते, परंतु सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी या मार्गावर ट्रॅक्टर परेड घेण्यास नकार दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस आणि शेतकरी यांच्यात परस्पर संमतीने ठरविलेले मार्ग कोणते आहेत ते जाणून घेऊया.

सिंघू बॉर्डर- ट्रॅक्टर परेड सिंघू बॉर्डर (Singhu Border) येथून निघणार असून संजय गांधी ट्रान्सपोर्ट, कंझावला, बवाना, औचिंडी बॉर्डर मार्गे हरियाणामध्ये जाईल.

टिकरी बॉर्डर- टिकरी बॉर्डर (Tikri Border) पासून ट्रॅक्टर परेड नागलोई, नजफगड, झौडा, बडली मार्गे केएमपीला जाईल.

गाझीपूर-युपी गेट- गाझीपूर युपी गेटपासून ट्रॅक्टर परेड अप्सरा बॉर्डर गाझियाबाद मार्गे यूपीच्या डासनाकडे जाईल.

राजधानीच्या सीमांवर मागील 2 महिन्यांपासून शेतकरी नवीन शेती विषयक कायद्याचा विरोध करीत आहेत. केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात या संदर्भात 10 वेळा चर्चा झाली आहे, परंतु अद्याप कोणत्याही मोठ्या प्रश्नावर सहमती झालेली नाही. सरकारने शेतकऱ्यांसमोर दीड वर्षे कायदे स्थगित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, पण हा कायदा मागे घ्यावा या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.