गोष्ट माणुसकीची…. निराधार आजींना पोलिसांनी मिळवून दिले आश्रयस्थान

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन

माणुसकी अजूनही शिल्लक आहे याची प्रचिती काल एका घटनेमुळे आली. मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात काल ६५ वर्षीय  आजी आल्या. त्यांनी ड्युटीवर असलेल्या पोलीस उपनिरीक्षक भालेराव यांची भेट घेतली.

लता शिवराजसिह परदेशी अशी या आजींनी आपली ओळख सांगितली. त्या म्हणाल्या की, “मला घर शोधावे लागेल, मी साकीनाका येथील एका रुग्णालयात दाईचे काम करीत होते आणि तिथेच राहात होते. काही दिवसांपुर्वी मला कामावरून काढण्यात आले. माझे कोणी नातेवाईक मुंबईत राहत नाहीत तसेच नातेवाईक कुणी देखभाल करीत नाहीत. त्यामुळे नोकरी आणि छप्पर अशा दोन्ही गोष्टी माझ्याकडे नाहीत.असे त्या आजींनी सांगितले. कोणीही मदत करीत नसल्यामुळे त्या साकीनाका येथील पोलीस ठाण्यात मदतीची आस घेऊन आल्या होत्या. पोलीस उपनिरीक्षक भालेराव यांनी या आजींसाठी मदतीचा हाथ पुढे केला. त्या आजींना कर्जत येथील वृद्धाश्रमात राहण्याची सोय करून दिली. तसेच साकीनाका पोलीस ठाण्यातील कर्मचा-यांकडून २२०० रुपयांची मदत आजींना केली. त्या फक्त २४ तासच पोलीस ठाण्यात होत्या पण तेवढ्या वेळात त्यांच्यासोबत वेगळीच बांधिलकी निर्माण झाल्याचे पोलीस उपनिरीक्षक भालेराव यांनी सांगितले.