बारावीची परीक्षा देताना अकरावीचा तोतया विद्यार्थी पोलिसांच्या स्वाधीन…

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाईन – अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रात बुधवारी  बारावीची परीक्षा देणाऱ्या तोतया अल्पवयीन परीक्षार्थ्यास केंद्रप्रमुखांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेचा शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

तोतया परीक्षार्थी येथील हा एका महाविद्यालयात अकरावीत शिकत आहे. त्याने  बारावीत शिकणाऱ्या त्याच्याच नात्यातील बारावीच्या परीक्षार्थीच्या जागेवर बसून बारावीचा संरक्षणशास्त्र विषयाचा पेपर देण्याचा प्रयत्न केला. तो हॉल क्रमांक २११ मध्ये होता. त्या हॉलवर पर्यवेक्षण करणारे प्रा. धुमाळ यांना ओळखपत्रावरील छायाचित्रावरून संशय आला.

त्यांनी केंद्र संचालिका प्रा. उषा सरदार (चिंचोलीकर) यांना ताबडतोब माहिती दिली. त्यांनी तोतया परीक्षार्थीस पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.