BJP च्या कार्यालयासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलसांनी माजी राज्यपालाच्या मुलाला घेतलं ताब्यात

लखनौ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौ येथे भाजपच्या मध्य प्रदेश कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर काल एका महिलेनं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्ररकरणी लखनौ पोलिसांनी माजी राज्यपाल सुखदेव प्रसाद यांचे पुत्र आलोक यांना ताब्यात घेतलं आहे. आलोक हे काँग्रेसशी संबंधित असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमागे काही कट कारस्थान असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

महाराजगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर लखनौ पोलिसांनी आलोक यांना ताब्यात घेतलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावर आलोक यांचं लोकेशन मिळालं होतं. तसंच आलोक हे या महिलेच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे.

लखनौमधील भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर काल एका महिलेनं ज्वालाग्राही पदार्थ अंगावर ओतून घेत स्वत:ला पेटवून घेतलं. त्यावेळी तिथं उपस्थित प्रसारमाध्यमांच्या कर्मचाऱ्यांनी आणि सुरक्षारक्षकांनी आग आटोक्यात आणत गंभीरपणे भाजलेल्या महिलेला सिव्हील रुग्णालयात दाखल केलं होतं. या महिलेची प्रकृती गंभीर आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित महिला अंजना तिवारी ही उत्तर प्रदेशातील महारजगंज येथील रहिवासी आहे. तिचा विवाह अखिलेश तिवारी याच्याशी झाला होता. मात्र विवाहाच्या काही दिवसांनंतर त्या दोघांमध्ये घटस्फोट झाला होता. त्यानंतर या महिलेनं धर्मपरिवर्तन करत आसिफ नावाच्या तरुणाशी विवाह केला होता. विवाहानंतर आसिफ रझा हा सौदी अरेबियाला निघून गेला. दरम्यान आसिफचे कुटुंबीय आपल्याला सातत्यानं त्रास देत असल्याचा जबाब या महिलेनं दिला आहे. तसंच या जाचाला कंटाळून या महिलेनं भाजप कार्यालयासमोर स्वत:ला पेटवून घेतलं होतं.

महाराजगंज पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही कारवाई होत नव्हती. त्यामुळं न्याय मिळावा यासाठी ती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊ इच्छित होती. मात्र तिची भेट होऊ शकली नाही. त्यामुळं निराश होऊ या महिलेनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पोलिसांनी या महिलेला रुग्णालयात दाखल केलं होतं.