तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी शोधून काढला तरुणीचा मोबाईल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कार्यक्रमादरम्यान गहाळ झालेला ५८ हजार २०० रुपयांचा महागडा आयफोन पुणे पोलिसांमुळे तरुणीला परत मिळाला. आपुर्वा मनोज भंडारी या तरुणीने फोन गहाळ झाल्याची तक्रार पुणे पोलिसांच्या वेबसाईटवर ऑनलाईन दाखल केली होती. पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तरुणीचा हरवलेला फोन परत मिळवून दिला.

आपुर्वा भंडारी ही तरुणी शुक्रवारी (दि.८) सुस रोड येथील मंगल कार्यालयामध्ये एका कार्यक्रमासाठी गेली होती. कार्यक्रमादरम्यान तिचा  आयफोन गहाळ झाला. याची तक्रार तिने पुणे पोलिसांच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने केली. रविवारी (दि.१०) रात्री भंडारी या तरुणीने खडक पोलीस ठाण्यात जावून तक्रार नोंदवल्याची प्रत पोलिसांना देऊन घडलेला प्रकार सांगितला.

रात्रगस्तीवर असलेले पोलीस शिपाई महावीर दावणे यांनी Find my phone या अॅपच्या आधारे त्यांनी तरुणीच्या मोबाईलचे लोकेशन तपासले. त्यावेळी मोबाईलचे लोकेशन महंमद वाडी येथील हॉटेल कोरीयन पार्क याठिकाणी मिळाले. मिळालेले लोकेशन हे सहा तासापूर्वीचे होते. त्यानंतर पोलिसांनी फोनवर संपर्क साधला मात्र तो बंद लागत होता.

पोलिसांनी हॉटेल कोरियन येथे जाऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान हॉटेलमधील केटरिंगचे काम करणारे कर्मचारी सुस रोडवरील मंगलकार्य़ालयात गेल्याची माहिती मिळाली. केटरिंगचे काम करणारे तिवारी यांच्याशी संपर्क साधून मंगलकार्य़ालयात शुक्रवारी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची यादी मागवली. फोन गहाळ झाला त्या दिवशी ४२ कर्मचारी कामावर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कर्मचाऱ्यांना फोन करुन मोबाईलबाबत चौकशी केली.

त्यावेळी बाणेर येथे राहणाऱ्या एका सफाई कामगाराला मोबाईल मिळाला असल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी कामगाराकडून मोबाईल ताब्यात घेऊन आपुर्वा भंडारी यांना तो परत केला. पोलिसांनी तपासचक्र फिरवून काही तासात मोबाईल सुखरुप परत केल्याने भंडारी यांनी पोलिसांचे अभार मानले.

ही कामगिरी खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे, पोलीस शिपाई महावीर दावणे यांनी केली.