Coronavirus : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी पोलिसांचा खडा ‘पहारा’, चौकाचौकात केली जाते तपासणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हडपसर गांधी चौकामध्ये वाहतूक आणि पोलीस स्टेशनचे पोलीस बंदोबस्त करीत होते. प्रत्येक वाहनाची तपासणी कसून तपासणी सुरू आहे. हडपसर आणि परिसरातील प्रत्येक चौकामध्ये पोलिसांचा खडा पहारा सुरू आहे. नागरिकांची तपासणी करीत गरज ओळखून पोलीस त्यांना सोडत आहेत, असे हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हमराज कुंभार यांनी सांगितले.

जनता कर्फ्यूनंतर सलग तिसऱ्या दिवशी रस्त्यावर पोलीस बंदोबस्त असल्यामुळे वाहनांची वर्दळ कमी झाली होती. मात्र, अन्नधान्य, भाजीपाला, गॅस आदी जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी नागरिक रस्त्यावर ये-जा करीत असल्याचे दिसून आले. प्रत्येक ठिकाणी चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात असल्यामुळे एका ठिकाणाहून सुटका झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या चौकात पोलीस अडवत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू नये, साखळी तुटली पाहिजे, यासाठी प्रशासनाने पाऊल उचलले आहे. त्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसादही दिला जात आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे. शाळा-महाविद्यालयांबरोबर अनेक कंपन्यांनीही सुटी जाहीर केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने थेट 21 दिवस म्हणजे 14 एप्रिल 2020 पर्यंत कर्फ्यूच लागू केला आहे. अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा अवलंब केला आहे.

भाजीपाला, तरकारी आणि अन्नधान्याचा पुरवठा करणारी वाहने आणि रुग्णवाहिका रस्त्यावर धावताना दिसत आहेत. नागरिकसुद्धा कामाशिवाय घराबाहेर पडत नाहीत, तीन-चार व्यक्तींनाही पोलीस एकत्र थांबू देत नाहीत. रुग्णाला उपचारासाठी घेऊन जावे लागत आहे. हॉस्पिटल आणि त्यांच्याशी निगडित औषधालयांच्या कर्मचाऱ्यांची तपासणी करून पोलीस सोडत आहेत. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी हडपसर गांधी चौकामध्ये वाहतूक आणि पोलीस स्टेशनचे पोलीस बंदोबस्त करीत होते. प्रत्येक वाहनाची तपासणी कसून तपासणी सुरू आहे, त्यामुळे नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे.