Pune : 50 हजाराचे लाच प्रकरण ! पोलीस निरीक्षक जाधव यांना ACB कडून अटक; वडगाव मावळ आणि चाकणमध्ये प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – न्यायाधीशांना ‘मॅनेज’करून फौजदारी खटला रद्द करण्यासाठी 50 हजार रुपयांच्या लाच प्रकरणात आज निलंबित पोलीस निरीक्षक अनिल उर्फ भानुदास जाधव यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यांना उद्या (मंगळवार) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

याप्रकरणी लाच घेताना प्रथम खासगी महिला एस. भालचंद्र गायकवाड (वय 29) यांना एसीबीने 50 हजार रुपयांची लाच घेताना जानेवारी महिन्यात अटक केली होती. त्यानंतर या गुन्ह्यात महिला न्यायाधीश यांचा देखील समावेश असल्याचे निष्पन्न झाले होते.

दरम्यान, याप्रकरणाचा एसीबीकडून तपास सुरू आहे. तर वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांना या लाच प्रकरणानंतर निलंबित करण्यात आले होते. ते सध्या निलंबित आहेत. या तपासात लाच प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांना आज सायंकाळी एसीबीने अटक केली आहे. त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मावळ न्यायलायात सुरु असलेल्या फौजदारी खटला मॅनेज करुन रद्द करण्यासाठी एका खासगी महीलेच्या माध्यमातून ५० हजार लाच स्विकारली होती. तिला अटक केली होती. यानंतर तिच्या मार्फत प्रथम न्यायदंडधिकारी महिला न्यायाधीश यांचा सहभाग आढळला. यानंतर आता याप्रकरणी जाधव यांचा सहभाग आढळला असून, त्यानुसार त्यांना अटक केली आहे. निलंबीत असलेले पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांनी चाकण पोलिस ठाण्यात लाच स्विकारताना 2019 च्या सप्टेंबर महिन्यात अटकेत होते. तेव्हापासून जाधव पोलिस दलातून आहे निलंबीत आहेत. आता त्यात लाच प्रकरणात त्यांना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.