विधवा महिलेवर वरिष्ठ पोलिस निरीक्षकाकडून बलात्कार, 24 तासात 2 पोलिस अधिकार्‍यांसह 5 जणांचं तडकाफडकी निलंबन

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूरमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचे काम पोलिसांवर आहे. मात्र पोलिसांवरच गुन्हे दाखल होत असतील तर न्याय कोणाकडे मागायचा असा सवाल सर्वसामान्य नागरिकाला पडला आहे. पोलिसांचे कारनामे पुढे येत असल्याने नागपूर पोलिसांचीच नाही तर महाराष्ट्र पोलीस दलाची मान शरमेने खाली गेली आहे. गेल्या 24 तासात 5 पोलिसांचे निलंबन करण्यात आले असून यामध्ये दोन पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

नागपूर पोलीस दलातील एका पोलीस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद भोळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अरविंद भोळे यांना निलंबित करण्यात आले आहे. भोळे यांच्यावर गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विधवेचे शारीरिक शोषण केल्याने त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद भोळे मुख्यालयात कर्यारत होते.

दुसरा प्रकार मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. जखमी वृद्ध रस्त्यावर पडून असताना घटनास्थळावर पोलीस पोहचले नसल्याने वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत वरिष्ठांनी चार जणांचे निलंबन केले. यामध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश आहे.