विधवा महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाच्या प्रकरणात पोलिस निरीक्षक अरविंद भोळेंना तात्पुरता ‘दिलासा’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – एका विधवा महिलेवर बलात्कार करणाऱ्या वादग्रस्त पोलिस निरीक्षक अरविंद भोळे यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. न्यायालयाने त्यांना तात्पुरता जामीन मंजूर केला असून गिट्टीखदान पोलिस ठाण्यात हजेरी लावून तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबतची माहिती अशी की, गिट्टीखदान परिसरात राहणाऱ्या पिडीत 45 वर्षीय महिलेचे पहिले लग्न 1988 मध्ये एका शिक्षकासोबत झाले होते. मात्र तिच्या पतीचे 2000 मध्ये अपघाती निधन झाले होते. पिडित महिलेला 21 वर्षाचा मुलगा आहे. 2019 मध्ये फेसबुकच्या माध्यमातून महिलेची PI भोळेंशी मैत्री झाली होती. त्यावेळी भोळे नंदनवन पोलीस ठाण्यात निरीक्षक होता. एक दिवस भोळेने पिडितेला लग्नासाठी विचारले. त्यानंतर 8 नोव्हेंबर 2020 ला कौंडण्यापूर (जि. वर्धा) येथील एका मंदिरात दोघांनी लग्न केले. त्यानंतर मोबाईलद्वारा महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढले. पत्नीच्या उपचारासाठी तिच्याकडून जवळपास 3 लाख पैसे उकळले. तिचे सोन्याचे दागिने लंपास केले. त्यानंतर 18 फेब्रुवारी रोजी महिलेला एकटीला सोडून भोळे निघून गेला. आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच महिलेने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गिट्टीखदान पोलिसांनी भोळेवर बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी भोळे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.